अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन

पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे कविसंमेलन घेतले आहे. ते अण्णा भाऊ स्वत: कवी होते. शाहिर होते, ज्यांच्या साहित्यातील लेखनाची दखल तात्कालिन काळात घेतली गेली नाही, जे आजच्याही काळात वास्तवतेचा अनुभव देते. त्यामुळे अण्णा भाऊंना भारतरत्न म्हणायला आवडेल. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक होते तर वंचितांच्या असंतोषाचे जनक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते असे प्रतिपादन केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती प्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, मातंग साहित्य परिषद व निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अखिल भारतीय मराठी कविसंमेलनाचे’ ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

“कविता एक विचार आहे, ज्याची ताकद अनुभवावी लागते. कवीच्या मनात अनेक संवेदनशील विचार घोळत असतात, जे गद्य अथवा पद्य अशा कवितेच्या रुपात बाहेर पडत असतात. परंतु जी ह्रदयातून येते, ती कविता असते.” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी कविसंमेलनाच्या अध्यक्ष पदावरुन मार्गदर्शन करताना केले.

‘आधार शोधताना आधार होत गेले! जो भेटला तसा मी आकार होत गेले!’ ही कविता आहे, मुंबईच्या शिल्पा परुळेकर पै यांची.

तर ‘लोकशाहीत काहीही घडते! वाळुला दगड म्हंटले जाते! विहिरीला समुद्र केले जाते!’ ही कविता आहे, गोवा येथील कवी रमेश वंसकर यांची.

अशा एकाहून एक आशयपुर्ण कविता भारतातील महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक येथील राज्यातून आलेल्या कविंनी सादर करुन उत्तरोतर कार्यक्रम रंगवत नेला आणि रसिकांना खिळवून ठेवले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, विवेक मासिकचे सह कार्यकारी संपादक रविंद्र गोळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, मातंग साहित्य परिषद चे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे अध्यक्ष महेन्द्रकुमार गायकवाड हजर होते.

रविंद्र गोळे आणि प्रदीप दाते, डॉ.धनंजय भिसे, महेन्द्र्कुमार गायकवाड यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.

सहभागी कवी

शोभा तेलंग इंदौर (मध्यप्रदेश), डॉ. अविनाश सांगोलेकर (पुणे) , रमझान मुल्ला (सांगली), रमेश वंसकर (गोवा) अरुंधती वैद्य (नागपूर), प्रसाद देशपांडे बडोदा (गुजरात), जोत्स्ना चांदगुडे (पुणे), राजेंद्र अत्रे (उस्मानाबाद), डॉ. अशोक शिंदे (फलटण), हनुमंत चांदगुडे (बारामती), नूतन शेटे (बंगलोर), संजय जगताप (पिंपरी चिंचवड), संगीता झिन्झुरके (पिंपरी चिंचवड), शिल्पा परुळेकर (मुंबई) आदि प्रतिभावंत कवी सहभागी झाले होते.

सदर कविसंमेलनास विविध राज्यातील कविंचा तसेच रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले तर नूतन शेटे यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार संजय जगताप यांनी मानले.