PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

काळेवाडी : विजय नगरमधील वैभव कॉलनी रस्ता खराब झाला असून साधारण मागील सात-आठ वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. अशी मागणी नागरिक करत आहेत.

विजयनगर मधील सर्वात प्रथम वसलेली ही कॉलनी असून बऱ्याच वर्षापुर्वी कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर महापालिकेने येथील रस्त्याकडे दुर्लक्ष केले. या कॉलनीतच जैन मंदिर असल्याने अनेक वयोवृद्ध नागरिक येथे उपासनेसाठी येत असतात. मात्र, रस्ता खराब झाल्याने अनेक नागरिक पाय मुरगळून पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी सांगितले.

PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

रहिवासी म्हणतात…

“रस्ता खड्डेमय झाला असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल होतो. डांबरीकरण चांगल्या दर्जाचे होत नाही, पावसाच्या पाण्याने वाहून जाते व गट्टू बसविले तर खाली-वर होतात. त्यामुळे लोक पडतात. म्हणून काँक्रिटीकरण झाले पाहिजे.”
छबीलाल आनंदा मोरे

“मागील कित्येक वर्षांपासून डांबरीकरण झाले नाही. महापालिकेकडे अनेकदा मागणी करूनही कार्यवाही झाली नाही, फक्त आश्वासन मिळाले. या कॉलनीत एका बिल्डरकडून मोठी किंमत मोजून रो-हाउस घेतले. मात्र, येथे रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधाच नाहीत.”
भानुदास वाघ

अगोदर रस्त्यावर गट्टू होते. त्यानंतर एका बिल्डरच्या बिल्डींगसाठी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर सात आठ वर्षे कोणी फिरकलेच नाही. सर्वच जण आश्वासन देतात, या ठिकाणी रस्ता होणे गरजेचे आहे.
मोशीन शेख