हडपसर (प्रतिनिधी) : हडपसर येथील एस.एम. जोशी महाविद्यालयात अँटी रॅगिंग विद्यार्थी तक्रार निवारण माहिती अधिकार समिती, समुपदेशन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दंत व शल्यचिकित्सक औंध रुग्णालयातील डॉक्टर सुहासिनी घाणेकर उपस्थित होत्या. त्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी आपल्या खास शैलीत घोषवाक्याद्वारे तंबाखूविरोधी जनजागृती करणाऱ्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी तंबाखूविरोधी शपथ ग्रहण केली. उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी अँटी रॅगिंग समुपदेशन केंद्राच्या प्रमुख डॉ. निशा गोसावी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना जाधव, डॉ. दिनकर मुरकुटे, प्रा. ऋषिकेश खोडदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. निशा गोसावी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. रंजना जाधव यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि बहुसंख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.