छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : अतुलनीय वैश्विक योध्या, कुशल प्रशासक, हिंदू पद्पातशाहीचे निर्माते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. ते केवळ मराठ्यांचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रशासनाचा, गनिमी काव्याचा, युद्धतंत्राचा आज जगभर अभ्यास केला जातो. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी येथे केले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते.

त्यावेळी पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण जगदाळे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉ. नीळकंठ डहाळे, कार्यालयाच्या उज्वला तावरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले, रयत विद्यार्थी मंचाचे धम्मराज साळवी, डॉ. कामायनी सुर्वे तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले की, महाराजांनी जातीभेद, धर्मभेद मानला नाही. ते धार्मिक होते परंतु सहिष्णू होते. त्याकाळच्या शासन व्यवस्थेत त्यांनी भूमापन करून ग्राम व नगर व्यवस्था निर्माण केली, शेतीसाठी शेततळी बांधणे, वृक्ष लागवड करणे, बंधारे बांधणे, तसेच पतसंस्थांची निर्मिती केली, न्यायव्यवस्था, आरमारची निर्मिती, गड-कोटव्यवस्था अशी चौफेर शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आजच्या शासक प्रशासनासाठी महाराजांचे कार्य आदर्शदायी आहे. तरुणांनी महाराजांच्या जीवन कार्याचा अभ्यास केला पाहिजे.” असे विचार कृष्ण प्रकाश यांनी मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले की, “छत्रपतींचा इतिहास नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवराय हे जगातले एकमेव असे राजे आहत जे चारशे वर्ष झाली तरी रयतेच्या मनामनात आहेत. आजही स्त्रियांना पुरुषांकडून शिवरायांच्या आदर्शाची अपेक्षा आहे. आपल्या जीवनातील स्वप्न, ध्येय्य पूर्ण करण्यासाठी तरुणांनी शिवरायांचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे.”

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “अन्याय अत्याचारा विरुध्य संघर्ष करून महाराजांनी सुराज्य व्यवस्था निर्माण केली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही अशी प्रशासन व्यवस्था तयार केली महाराजांना रयतेची जाण होती. या रयतेसाठी त्यांनी स्वराज्य उभे केले. महाराजांचा आदर्श ठेवूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. मनोगत रयत विद्यार्थी मंचाचे धम्मराज साळवी यांनी व्यक्त केले. तर डॉ. कामायनी सुर्वे यांनी सुत्रसंचालन केले.