रहाटणीत ‘शासन आपल्या दारी’ व महाआरोग्य शिबिराचा १५०० नागरिकांनी घेतला लाभ

रहाटणीत 'शासन आपल्या दारी' व महाआरोग्य शिबिराचा १५०० नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन व पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी हा उपक्रम गुरूवारी रहाटणीतील विमल गार्डन येथे संपन्न झाला. रहाटणी, काळेवाडी, थेरगाव परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शासकीय दाखले यावेळी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे १५०० नागरिकांनी लाभ घेतला.

यामध्ये उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड नोंदणी व दुरूस्ती, नॉनक्रिमीलीअर दाखला, संजय गांधी निराधार योजनेतील विविध दाखले, श्रावण बाळ योजनेतील विविध दाखले तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालय निगडी यांच्या वतीने नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, नावे कमी करणे, विभक्त शिधापत्रिका, रास्तभाव दुकान बदलणे, पत्ता बदलणे आदी शिधापत्रिकेतील बदल नागरिकांनी यावेळी केले.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था व समाजकल्याण विभाग पुणे यांच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शक केले गेले. तसेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिजामाता रूग्णालय व पिंपळे सौदागर दवाखाना, एएसजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.

त्यावेळी डॉ. प्रतिभा डेंटल क्लिनिक व इम्पॅक्ट सेंटर त्यांच्या वतीने दंत तपासणी केली गेली, तसेच जिजामाता रुग्णालय व पिंपळे सौदागर दवाखान्याचे प्रफुल्ल तपशालकर यांच्या टीमने स्त्री रोग, गरोदर माता तपासणी, किशोरवयीन मुलींची समुपदेशन, त्वचा रोग, कोविड-१९ लस व बुस्टर डोस, राजीव गांधी जनआरोग्य योजनेतील माहिती, लहान मुलांची तपासणी तसेच स्वामी समर्थ हेल्थ सेंटर चिंचवड यांच्या वतीने रक्तदान तपासणी शिबीर, हिमोग्लोबीन तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तगट तपासणी, टाबी, थायरॉईट तपासणी केली गेली.

ओएसजी आय हॉस्पिटल तर्फे 334 लोकांचे मशीनमधून डोळे तपासणी करून चष्म्याचे नंबर काढून देण्यात आले. तसेच शहरामध्ये रक्त तुटवडा निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 245 लोकांनी दंत तपासणी करून घेतली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराच्या माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी स्वप्निल पटांगे, संजय गांधी योजनेचे भीमाशंकर बनसोडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, समता दुत प्रशांत कुलकर्णी व भारती अवघडे, प्रकाश राठोड, ज्येष्ठ समाजसेविका शारदा मुंढे, उद्योजक अनिल आसवानी, समस्थ रहाटणी गावकरी मंडळाचे अध्यक्ष देवाआप्पा नखाते, मोरेश्वर नखाते, राजु भालेराव आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले तसेच अन्न नागरी पुरवठा संरक्षण विभाग विभागाचे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, तसेच बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.

“विद्यार्थ्यांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी विविध प्रकारचे शासकीय दाखले देण्यासाठी नागरिकांच्या हितासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला. असे प्रतिपादन माजी महापौर माई ढोरे यांनी केले. या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरूण चाबुकस्वार व सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार यांनी केले होते. सुत्रसंचालन सचिन कळसाईत यांनी केले, तर अमित भालेराव यांनी आभार मानले.