किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे

किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता - सायली नढे 
  • पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमय्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : किरीट सोमय्या यांच्या जागी इतर पक्षाचा कोणता नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता. सोमय्या हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही किरीट सोमय्या यांचा जोडे मारून निषेध करतो. असे म्हणत काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा सायली किरण नढे यांनी भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने महिला अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये झालेल्या अमानवी महिला अत्याचाराच्या व किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या नग्न व्हिडिओ तसेच भाजप सरकारच्या विरोधात किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सायली नढे बोलत होत्या.

त्याप्रसंगी माजी नगरसेविका निगार बारस्कर, श्यामला सोनवणे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा स्वाती शिंदे, आशा भोसले, सोनू दमवानी, निर्मला खैरे, रंजना सौदेकर, अर्चना रसाळ, मयुरी कांबळे, अभिमन्यू दहीतुले, हरीश डोळस, भाऊसाहेब मुकुटमल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजपवर हल्ला करताना सायली नढे म्हणाल्या की, भारतात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. काँग्रेसच्या काळात महीला सुरक्षित होत्या. मात्र, भाजपा सरकार आल्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्याचबरोबर तेल, वाढ गॅस वाढ, अनेक घरगुती वस्तूचे भाव वाढले आहेत. भाजपा महागाई कमी करण्यात असफल झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला काँग्रेसला निवडून देऊन भाजपला हद्दपार करावे.

गृहमंत्री व्हिडिओची चौकशी करणार का?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चौकशी होयला पाहिजे होती. मात्र, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याने कुठल्याही चौकशी व कोणतीही कारवाई झालेली नाही. भाजप एकीकडे बेटी पढाव बेटी बचावचा नारा देत आहे आणि दुसरीकडे भाजपाचे नेते जे आहेत, ते महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल करत आहेत. अशा नेत्यांवरती कारवाई होणार का? महाराष्ट्राचे गृहमंत्री या व्हिडिओची चौकशी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. असेही यावेळी नढे म्हणाल्या.