पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ

पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ
  • उन्नती सोशल फाउंडेशन, सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले. या शिबिराचा सुमारे १०० दिव्यांगांनी लाभ घेतला. सदर शिबीर दिवंगत डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, प्रबोधनकार शारदा मुंढे, रमेश वाणी, सखाराम ढाकणे, आर. के. पाटील, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, प्रकल्प व्यवस्थापक विशाल पवार, क्लेम विभाग प्रमुख रुशाली बोरसे, नंदकिशोर आहेर आदी उपस्थित होते.

पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ

दिवंगत डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेऊन विशेष मुलांसाठी होमिओपॅथी उपचार पद्धत विकसित केली. त्यांनी आजवर लाखो मुलांना निस्वार्थपणे मोफत उपचार दिले आहेत. प्रेडीक्टिव होमिओपॅथीचे पुणे विभाग प्रमुख डॉ. रजत मालोकार, डॉ. रोहित देशमुख, डॉ. श्रद्धा लांजेवार, डॉ. शिवानी पाल, डॉ.दिपाली साळुंखे, डॉ. वैशाली देवकर, डॉ. शिव प्रताप सिंह यांनी निस्वार्थ भावनेने दिव्यांगाची सेवा केली.

उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, “दिव्यांग मुलांचे पालन पोषण करणे, हे पालकांच्या दृष्टीने खुप मोठी जिकीरीची गोष्ट आहे. अशा मुलांसाठी आपणही काही योगदान दिले पाहिजे, या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवेतून एक प्रकारे वेगळेच समाधान मिळते.”

सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे म्हणाले की,” सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी हि संस्था गेली अनेक वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करीत आहे. आजपर्यंत “सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा केंद्रातून हजारो दिव्यांगाना सहयोग दिला आहे. तसेच यापुढेही असेच नाविन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे.”

सदर उपक्रमासाठी सप्तर्षी फाउंडेशनचे अध्यक्षा वैशाली मुळे, सचिव श्रीकांत चव्हाण व सदस्य वरुण सावरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहिले आहे, तसेच येणाऱ्या काळात उन्नती फाउंडेशन सारख्या विविध सामाजिक संस्थांसोबत विविध सामाजिक संवेदनशील विषयांवर काम करण्याचा संस्थेचा मानस आहे. असेही बोरसे यांनी सांगितले.

शिबिराचे मुख्य संयोजक उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व संस्थापक संजय भिसे यांचे विशेष सहकार्य लाभले.