मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने तळेगाव दाभाडेत हिंदू जनगर्जना मोर्चा; विविध संस्था, संघटना व सर्व राजकीय पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग

मावळ दि:१३ (लोकमराठी)- मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे दि.१२ रविवार रोजी हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या’धर्मवीर दिन’ जाहीर करावा, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी,या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

वतननगर येथील श्री संतोषीमाता मंदिरापासून या मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात राम कृष्ण हरी… जय श्रीराम…हर हर महादेव…पवनपुत्र हनुमान की जय… जय भवानी, जय शिवाजी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय… भारत माता की जय… असा जयघोष करण्यात येत होता. नागरिक हातात भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. लहान मुले, तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तळेगाव स्टेशन चौक, गाव भाग, जिजामाता चौक, राजेंद्र चौक, बाजार पेठेतून श्री मारुती चौक येथे मोर्चा आला. तेथे जाहीर सभा घेण्यात आली. आमदार नितेश राणे, कालिचरण महाराज,आखाडा परिषद उपाध्यक्ष सुनीलशास्त्री महाराज,ऍडव्होकेट मृणाली पडवळ, तसेच शंकर महाराज मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कालीचरण महाराज यांनी शिवतांडव स्तोत्र गायन केले.