कुप्रसिद्ध 14-12 (KR) टोळी आणि अट्टल घरफोडी चोर ‘जयड्या’च्या भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कुप्रसिद्ध 14-12 (KR) टोळी आणि अट्टल घरफोडी चोर ‘जयड्या’च्या भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी चिंचवड : भोसरी परीसरात कुप्रसिद्ध असलेली 14-12 (KR) किरण राठोड टोळी आणि घरफोडीत शंभरीच्या उंबरठ्यावर असलेला अट्टल घरफोड्या चोर जयवंत उर्फ ‘जयड्या’ गोवर्धन गायकवाड याच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडुन 200 ग्रॅम सोन्याच्या व 200 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 10 लाख 39 हजार 135 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परीसरात कुप्रसिद्ध असलेल्या KR टोळीचा म्होरक्या किरण गुरुनाथ राठोड ( वय- 23 वर्ष सध्या रा. साईबाबा मंदिर जवळ, दिघी, मुळगाव मु.पो. शाहपुर, ता. गुलबर्गा जि. गुलबर्गा), भगतसिंग सुरजसिंग भादा ( वय- 19 वर्ष रा. आदर्शनगर, शिव कॉलनी, गणेश मंदिर मागे, दिघी) करण राठोड आणि अभिषेक नलावडे यांनी दिघी रोड येथील एका चिकनच्या दुकानात शिरुन दुकान मालकाच्या गळ्याला कोयता लावुन “ मी भोसरीचा दादा आहे, माझे नाव किरण राठोड, मला कोणी नडायचे नाही. ” असे मोठ्याने सांगत गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने काढुन घेतले.

तसेच रस्त्यावर थांबलेल्या गाड्यांच्या काचा फोडुन दहशत माजवली होती. भोसरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलीसांनी या टोळीचा शोध सुरु केला. दरम्यान, भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि समिर रासकर यांना माहिती मिळाली की, आरोपी हे खेड तालुक्यातील औंढे गावातील एका डोंगरात लपुन बसलेले आहेत आणि ते कर्नाटक राज्यात पळुन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि टॉवर लोकेशन आधारे पोलीसांनी डोंगर भागात सापळा रचुन पाठलाग करुन टोळीचा म्होरक्या किरण राठोड आणि आरोपी भगतसिंग भादा यांना तपासकामी अटक केली.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी त्यांच्याकडुन भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या नऊ गुन्ह्यातील 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, 11 हजार रोख रक्कम असा एकुण 04 लाख 29 हजार 125 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन नऊ गुन्हे उघडकिस आणले आहेत.

भोसरी पोलीसांच्या दुसऱ्या कारवाई मध्ये घरफोडीत शंभरी पर्यंच पोहचलेल्या जयवंत गोवर्धन गायकवाड उर्फ जयड्या या अट्टल घरफोड्याला त्याचा एक साथीदार सचिन धनराज पवार ( वय- 28 वर्ष रा. आदर्शनगर, दिघी ) अशा दोघांना अटक केले आहे.

आरोपी जयड्या याने आतापर्यंत 87 घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी त्याच्याकडुन चोरी केलेला एकुण 06 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच घरफोडी केल्याचे गुन्हे उघड केले आहेत.

जयड्या स्वतः व्हायचा पोलीस ठाण्यात हजर

घरफोडी केल्यानंतर आपण सीसी टिव्ही फुटेज मध्ये कैद झालो आहोत. पोलीस आपला शोध करीत आहेत. अशी कुणकून लागताच आरोपी जयड्या हा स्वतःहुन स्थानिक पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा कबुल करीत होता. विधीसंघर्षित बालकांना हाताशी धरुन तो घरफोडी करीत असे. आतापर्यंत त्याने 87 घरफोडी करण्याचे गुन्हे केले आहेत.

KR किरण राठोड टोळीवर लागणार मोका

भोसरी तसेच आजुबाजुच्या पोलीस ठाण्याच्या परीसरात जबरी चोरी आणि अट्टल घरफोडी करणारी चोरांची कुप्रसिद्ध KR म्हणजे किरण राठोड टोळी वर मोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिली आहे. निगडी पोलीसांना तो पाहिजे आरोपी आहे. पोलीस आयुक्तांच्या या कारवाई मुळे भोसरी तसेच आजुबाजूच्या परीसरात दहशत निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचे धाबे दणाणले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, आर.व्हि.बोयणे, गणेश सावंत, बाळासाहेब विधाते, सुमित देवकर, विनोद वीर, समिर रासकर, संतोष महाडिक, अजय डगळे, सागर भोसले, आशिष गोपी, राजु जाधव, मार्तंड बांगर, स्वामी नरवडे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.