पुणे, दि.२१ (लोकमराठी) – आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई मासई नगर, तांबरम चेन्नई), रविंद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलिस क्वॉर्टर, वेल्लूर), यादवराज शक्तीवेल (रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम, चेन्नई) आणि आर सुधाकरण (रा. वेंडलूरू, कांचीपुरम चेन्नई) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; मागील चार महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट आणि डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना सुचना केल्या होत्या.
त्यानुसार पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देवून शिरूर विभागाच्या तपास पथकाला दाखल गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यास सांगितले. चोरीस गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने निष्पन्न झाले. चोरीच्या गाड्या कोणत्या राज्यात आहेत, याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळविली असता चोरी गेलेली वाहने तामिळनाडु राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे शिरूर विभागाचे तपास पथक चैन्नई येथे पाठवून राजा कल्याण सुंदराम, रविंद्रम गोपीनाथम, यादवराज शक्तीवेल यांना ताब्यात घेवून एक डिझायर कार हस्तगत केली. त्यांचेकडे मिळून आलेली कार त्यांना आर सुधाकरण याने दिली होती. सुधाकरण याला शाहगढ जालना परीसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे तपास केला असता त्याने मागील चार महिन्यात एकूण दहा गाड्या खरेदी केल्या असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवून त्याचेमार्फत तीन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली. यामध्ये ३० लाख रूपये किंमतीच्या चार कार असून त्यामध्ये दोन स्विफ्ट आणि दोन डिझायर कारचा समावेश आहे.
आरोपी सध्या शिरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात पोलीस कस्टडी मध्ये आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात ५० चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करत बारा आरोपींना अटक करून ३९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेष घट्टे यांचे मार्गदर्शखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव षेलार, पोसई गणेष जगदाळे, सफौ. तुशार पंदारे, पोहवा दिपक साबळे, पोहवा सचिन घाडगे, पोहवा राजू मोमीण, पोहवा जनार्दन शेळके, पोहवा योगेश नागरगोजे, पोहवा अजित भुजबळ, पोहवा मंगेश थिगळे, पोना संदिप वारे, पोना अमोल शेडगे, पोना मंगेश भगत, पोकाॅ अक्षय नवले, चापोकाॅ अक्षय सुपे, चापोकाॅ दगडु विरकर यांनी केली आहे.