एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

हडपसर : महाराष्ट्र ही संतांची पंडितांची व शाहिरांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी ही साहित्यासाठी सकस भूमी आहे . साठोत्तरी काळातील साहित्यात वास्तव जीवन मोकळेपणाने व्यक्त झाले . शोषितांचे जीवन या साहित्यातून व्यक्त झाले. नव्या लेखकांनी आपल्या लेखणीतून नवा समाज उभा केला पाहिजे. असे विचार नेदरलँडचे कवी व चित्रकार मा. भास्कर हांडे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील मराठी विभाग आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये “मराठीतील 1960 नंतरचे विविध वाड्मयीन प्रवाह व सद्यस्थिती” या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

या वेबिनारचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, कलावंत हा माणसाच्या कल्याणाचा विचार करतो. तो शांतीचा प्रतीक असतो. साहित्य माणसाला जोडण्याचे काम करते. साहित्य सुखाची पेरणी करते .एकविसाव्या शतकात महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या प्रेरणेने दलित साहित्य लिहिले गेले. दलित साहित्याची कोंडी आदिवासी साहित्य प्रवाहाने फोडली. मुस्लीम साहित्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार व्यक्त होत आहे. साने गुरुजींनी जगावर प्रेम करा, असे सांगितले तर येशू ख्रिस्त शत्रूवर सुध्दा प्रेम करा असे सांगतात. अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे हे विश्‍वात्मक पोवाडे आहेत. या शतकात सर्व धर्मियांना शांतपणे जगावे लागेल. एकमेकांना समजुन घ्यावे लागेल .स्त्रीवादी साहित्यातून स्त्री-पुरुष विषमता दूर झाली पाहिजे हा विचार मांडला गेला आहे. साठोत्तरी कालखंडातील दलित, आदिवासी, ग्रामीण, स्त्रीवादी, मुस्लिम हे साहित्यप्रवाह मानव मुक्तीसाठी निर्माण झाले आहेत. मानव मुक्ती हाच या साहित्याचा ध्येयवाद आहे. मानव मुक्तीसाठी कवी, लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय माणूस एकमेकाला जोडला गेला पाहिजे. बुद्ध,महावीर,पैगंबर यांच्या प्रेरणेने निर्माण होणारे साहित्य हे विश्व नागरिकत्वाची संस्कृती जन्माला घालण्यासाठी निर्माण झाले आहे. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी साठोत्तरी वाङ्मय निर्माण झाले आहे .यातून विश्वात्मक माणूस तयार होईल, असा आशावाद डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. ते आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे हे अध्यक्षस्थानी होते. हे वेबिनार वैचारिक दिशा देणारे आहे .महाराष्ट्र भूमी साहित्यासाठी कसदार भूमी आहे.त्यामुळे नवीन प्रवाह साहित्यात उदयाला आले.सामाजिक जीवनाचे वास्तव प्रतिबिंब या साहित्यात उमटले आहे.स्वातंत्र्य,समता, बंधुभावाची भावना साठोत्तरी प्रवाहातून दिसून येते. साहित्याचा केंद्रबिंदू माणूस आहे.

फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव या साहित्यावर दिसून येतो. महात्मा फुले यांनी शैक्षणिक जाणीव पेरली. माणसाला माणूस करण्याचे काम केले. ग्रामीण साहित्यातून ग्रामीण संस्कृतीचे, समाजाचे दर्शन घडत असते. असे डॉ.शिवलिंग मेनकुदळे म्हणाले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

समारोप समारंभ प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले की, सध्या काळ बदललेला आहे. शोषणाच्या बाजूने बोलणारे आपण राहिलो नाही .अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आज जातीव्यवस्था शोषणाचे हत्यार नसून अस्मितेचे प्रतीक बनले आहे. प्रामाणिकपणे बोलणारे अभ्यासक कमी झाले आहेत. असा विचार त्यांनी व्यक्त केला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये विचारांचे मंथन झाले. साठोत्तरी मराठी प्रवाहाने मराठीला वैभव प्राप्त करून दिले. आपली मराठी वैभवशाली आहे. काळाप्रमाणे या भाषेने बदल स्वीकारला. साठोत्तरी कालखंडात शोषित, वंचित शिकू लागला. शिक्षणामुळे आत्मभान आले. त्यातूनच अनेक प्रवाह तयार झाले. साहित्यनिर्मिती झाली. शोषितांच्या व्यथा-वेदना या साहित्याने मांडल्या. या नवीन प्रवाहाने मराठी वाङ्मयाची उंची वाढवली. मराठी भाषेची कक्षा रुंद केली. मराठी साहित्याने उदात्‍त जीवनमूल्यांचे दर्शन घडवले पाहिजे .या प्रवाहाने खेड्यातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. नवीन प्रवाहाची पालवी वृक्षाखाली गळाली तरी चालेल, सुगंध मात्र दिला पाहिजे, असा भावपूर्ण विचार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी समारोप समारंभप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मांडला. गोवा विद्यापीठाचे डॉ. चिन्मय घैसास, डॉ.तुकाराम रोंगटे, डॉ. सुधाकर शेलार ,अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे डॉ. ताहेर पठाण डॉ. शैलेश त्रिभुवन डॉ. संदीप सांगळे यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय बेबिनारसाठी 772 संशोधक अभ्यासकांनी नाव नोंदणी केली होती.

आंतरराष्ट्रीय वेबिनारचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री, प्रा. प्रांजली शहाणे, संदीप वाकडे व डॉ. विश्वास देशमुख यांनी केले. आभार डॉ. अतुल चौरे यांनी मानले. या ऑनलाईन समारंभाला उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ.संजय जडे, आय.क्यू. ए. सी.चेअरमन डॉ. किशोर काकडे तसेच मोठ्या संख्येने संशोधक अभ्यासक, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक ऑनलाइन उपस्थित होते.