
मुंबई, (लोकमराठी) : शिवसेनेने मागितलेला अधिक वेळ राज्यपालांनी नाकारल्यानंतर आज रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीला राजभवनावर पाचारण केले. दरम्यान, आम्हाला का बोलावले, नेमके कशासाठी बोलावले आहे, हे माहित नाही. मात्र राज्यपालांचा फोन आल्याने आम्ही राजभवनावर जात आहोत,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील त्यानंतर राजभवनाकडे रवाना झाले.
राज्यपालांनी शिवसेनेला केवळ २४ तासांची मुदत दिली होती, त्यामध्ये सगळ्या आमदारांच्या सह्या घेणे शक्य नाही. आता आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलावल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले असून आम्ही काँग्रेसशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे आज संध्याकाळी शिवसेनेने राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी दोन दिवसांचा वाढीव अवधी मागितला. मात्र राज्यपालांनी अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे. काँग्रेसने आज दिवसभर बैठका केल्या. सकाळी वर्किंग कमिटी नंतर अहमद पटेल-सोनिया गांधी अशा बैठका झाल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजल्यापासून काँग्रेस आमदारांबरोबर सोनिया गांधी यांची बैठक झाली. त्यानंतरही काही निर्णय झाला नाही.
शरद पवार यांच्याशी बोलून, काँग्रेसचे वरिष्ठ नेते दोन दिवसांत निर्णय घेतील, असे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खर्गे, राजीव सातव यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचा निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेना आज राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा दावा करू शकलेली नाही.
राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होणार आहे, तर काँग्रेस सरकारला बाहेरून पाठींबा देणार आहे, या स्वरूपाच्या चर्चा दिवसभर सुरु होत्या, पण त्यावर अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत झाला नाही. महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज दुपारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्याच्या हॉटेल ताजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने पाठींब्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिल्याचे समजते.
उद्धव यांच्याबरोबर आदित्य ठाकरे उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या बाजूने शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ‘एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
कृपया खालील लिंकला क्लिक करून आमच्या LOk Marathi News या फेसबुक लाईक करा.