लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा | भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर

लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा | भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर

रोहित आठवले

फेसबुक-इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणारी दोन प्रकरण नुकतीच पुढे आली. तर याच माध्यमातून कॉलेजिअन्संना रस्त्यावर उतरविणारा भाऊही नावाजला गेला. परंतु, या सगळ्यांच्या पोस्टला होणारा लाईक अँड शेअरचा दररोजचा आर्थिक डोलारा हा काही लाखात असून, या माध्यमावर सुरू असलेले भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्नकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

स्थानिक #पोलिस, राज्य पोलिस, #एटीएस, #नर्कोटिक कंट्रोल ब्यूरो यासह देशातील विविध तपास आणि गुप्तचर यंत्रणांची स्वतंत्रपणे सोशल मीडियाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी टीम असते. पण यातील एकाही यंत्रणेला महाराष्ट्रात एकाच वेळेस विविध ठिकाणी कॉलेजिअन्स् रस्त्यावर उतरणार असल्याचे समजले नव्हते. तसेच सोशल मीडियावरून पर्सनल ॲप्लीकेशन डाउनलोड करायला सांगून त्याद्वारे सुरू असलेला सॉफ्ट पॉर्नचा धंदा आणि त्यातून चालणारी आर्थिक उलाढाल अद्याप पर्यंत यंत्रणांना समजलेली नाही.

फेसबुक-इंस्टाग्राम अथवा अन्य सोशल मीडियावरील फॉलोवर्स वाढवणारे सगळेच प्रोफाईल सॉफ्ट पॉर्न आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. इमानेइतबारे या नव्या व्यवसायात उतरलेले तसेच नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांचे फॉलोवर्स आणि ते वाढवण्यासाठीची धडपड ही निराळी आहे.

व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहणारे आपली पोस्ट जास्तीत जास्त लाईक होईल, शेअर होईल, ती पाहिली-वाचली जाईल आणि त्यामुळे #ॲडसेन्सच्या माध्यमातून किंवा #इंटरनेट एंगेजमेंट (फेसबुक-इंस्टाग्राम) वाढवल्याबद्दल मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर समाधानी असणारे बरेच आहेत.

अनेक प्रोफाइल हे ठराविक विषयाला, व्यवसायाला, जाहिरात करण्याकरिता वाहिलेले आहेत. तर अनेकजण केवळ लाईक-शेअर-फॉलोवर्स आणि त्यातून मिळणारा पैसा एवढ्यावरच सिमीत आहेत. परंतु या आडून चालणारा भाईगिरी-दादागिरी आणि सॉफ्ट पॉर्नचा व्यवसाय मोडून काढण्याची गरज आहे.

पर्सनल ॲपवरून असा चालतो #सॉफ्ट_पॉर्नचा धंदा

आपल्या #पर्सनल_ॲप्लिकेशनची जाहिरात या तरुणी खास करून इंस्टाग्राम वरून करताना दिसून येतात. यातल्या अनेक तरुणींच्या #इंस्टाग्राम #फॉलोवर्स ची संख्या पाहता ती किमान १ लाख ते ५० लाख एवढी आहे. त्यावर या तरुणी अर्धनग्न फोटो-व्हिडिओ अपलोड करतात. काही सेकंदाच्या व्हिडिओ नंतर पूर्ण व्हिडिओ करिता लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड होते आणि सुरु होतो आर्थिक मानसिक शारीरिक शोषणाचा नवा अध्याय..

नव्याने चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या ठराविक तरुणींचे, अनेक अभिनेत्रींचे त्यांच्या नावाने #पर्सनल_मोबाईल_ॲप्लीकेशन आहेत. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ठराविक रक्कम भरताच त्या तरुणींचे अर्धनग्न फोटो, व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची क्वचित ते डाउनलोड करण्याची मुभा दिली जाते. अतिरिक्त पैसे भरल्यावर काही तरुणी थेट तुमच्याशी न्यूड व्हिडिओ चॅट करायला देखील तयार होतात. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ५० ते १०० रुपयांपासून सुरू होणारा हा उद्योग एका सेशन करीता १० ते १५ हजार रुपये एवढा असून, यातील काही जणी तर थेट भेटायलाही तयार असतात.

नुकताच एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि मराठीतील अशा प्रकारचा चित्रपट म्हणून बऱ्यापैकी त्याचा व्यवसाय देखील झाला. या चित्रपटात लक्षवेधी भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीचेही पर्सनल ॲप्लीकेशन आहे. त्यावरील तिच्या अभिनयावरूनच तिला हा चित्रपट मिळाल्याचे समजते. तर ही नवाभिनेत्री, तरुणांनी तिचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे म्हणून इंस्टाग्रामवरून भावना चाळविण्यासाठी जो काही खटाटोप करतो तो भयंकर आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्थान अढळ असणारी भरभक्कम स्टारकास्टची एक अर्ध हिंदी-मराठी वेब सिरीज मध्यंतरी खूप गाजली. या वेबसीरीज मध्ये साइड रोल करणारी एक अभिनेत्री सध्या अशाच प्रकारच्या पर्सनल ॲप्लीकेशन मुळे चांगलीच चर्चेत आहे.

गुजराती, हिंदी चित्रपटात भूमिका केलेली, अनेक वेब सिरीजमध्ये लीड रोल असलेली आणि गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली एक मॉडेल, तिच्या “डेली अपडेटेड पर्सनल ॲप्लीकेशन” मुळे गेल्या ३ ते ४ वर्षात नव्याने सोशल मीडियावर नावारूपाला आली आहे.

पर्सनल ॲप्लिकेशनचा हा आर्थिक डोलारा पाहता अनेक तरुणी या व्यवसायाकडे वळून पाहत आहे. ए ॲप्लीकेशन आणि पेमेंट गेटवे करिता पैसे मिळावेत म्हणून सुरुवातीला इंस्टाग्राम वरच नको ते उद्योग करत आहेत. तर दुसरीकडे याची सवय लागल्यानंतर पैसे वाचवण्याकरिता तरुण अन्य मार्गे किंवा मोफत अशाप्रकारे कुठे व्हिडिओ कॉल्स मिळतील का हे शोधताना नाडले जात आहेत.

फेसबुक वरून किंवा अन्य ॲप वरून व्हिडिओ कॉल लावल्यानंतर #स्क्रीन_रेकॉर्डिंग द्वारे ठराविक कालावधीतील #व्हिडीओच्या माध्यमातून कालांतराने ब्लॅकमेल करण्याचे उद्योगही राज्यात सर्रासपणे सुरू आहेत. परंतु आपलाच आंबटशौकीनपणा उघड होईल या भीतीने याची तक्रार करण्यास लोक पुढे येत नाहीत. तर, अशाप्रकारे ब्लॅकमेल (#सेक्सट्रॉर्शन) होत असून, आमच्या कडून पैसे उकळले हे सांगणारे प्रत्येक शहरात एक जण तरी दिवसागणिक पोलिसांकडे येत आहेत.

व्हेरिफाईड अकाऊंट आणि फॉलोवर्स

फेसबूक अकाऊंट, पेज, इंस्टाग्राम, ट्विटर अकाऊंट ला फॉलोवर्स, लाईक आणि शेअर विकत मिळते हे सर्वजण जाणतात. पण हे #अकाऊंट_व्हेरिफाईड (ब्लू टीक) करण्यासाठीही पैसे मोजले जातात. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनोरंजन क्षेत्र, माध्यम प्रतिनिधी-संपादक, प्रशासकीय अधिकारी हे देखील अशा प्रकारे #ब्लू_टीक मिळविणाऱ्यांच्या रांगेत आहेत.

जेवढे लाईक आणि शेअर जास्त तेवढे पैसे जास्त असा हा उद्योग आता उदयाला येत आहे. बॉलीवूड मधील पहिल्या रांगेतील अभिनेते-अभिनेत्री असो किंवा काही प्रतिथयश व्यावसायिक असो यांनी एखादा फोटो व्हिडिओ सोशल मीडिया वर अपलोड केल्यास त्याबदल्यात त्यांना मिळणारी रक्कम ही खूप मोठी आहे. त्यामुळे हाच धागा पकडून सुरुवातीला मजा म्हणून नंतर पैसे कमावण्याचे नवे साधन म्हणून या सगळ्याकडे #तरुणाई आता पाहू लागली आहे.

देशातील सर्वोच्च राजकीय नेते ते गल्लीतील उभरता कार्यकर्ता आज सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, लोकांची अभिरूची आणि पेड व्हेरिफाईड अकाऊंट, फॉलोवर्स यामुळे नेमके खरे काय असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

अगदी उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास शिवीगाळ, अश्लीलता, लोकांच्या चेष्टा-मस्करीचे व्हिडिओ अपलोड करणारे प्रोफाइल आणि राज्यातील नव्याने उदयास येणाऱ्या बलाढ्य कुटुंबातील एका #राजकीय नेतृत्वाच्या #प्रोफाइलचे फॉलोवर्स पाहिल्यावर हा विरोधाभास नक्कीच स्पष्ट जाणवतो.

सोशल मीडियाद्वारे चालणाऱ्या देशविघातक किंवा #दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणांनी याप्रकारच्या अँटी सोशल ॲक्टिविटीकडे वेळीच लक्ष देऊन हे मानसिक #अघातवादी प्रकार थांबविण्याची गरज आहे. अन्यथा हे प्रकार भविष्यात मोठी #समस्या निर्माण करू शकते.