काळेवाडीतील बंद पथदिवे रॉयल फाउंडेशनने केले सुरू

काळेवाडीतील बंद पथदिवे रॉयल फाउंडेशनने केले सुरू

लोकमराठी न्यूज नेटवर्क

काळेवाडी : परिसरातील अनेक पथदिवे मागील बऱ्याच दिवसांपासुन बंद होते. रॉयल फाउंडेशनने असे २५ पथदिवे महापालिका विद्युत विभागाच्या मार्फत सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रॉयल फाउंडेशनचे आभार मानले आहेत.

ज्योतिबानगर व राजवाडेनगर भागातील अनेक पथदिवे बंद होते. तर काही लुकलुकत होते. त्यामुळे रस्त्यांवर अंधार पसरत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबत रॉयल फाउंडेशनकडे पुष्कळ तक्रारी आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी परिसरातील पथदिव्यांची पहाणी केली. त्यामध्ये सुमारे २५ पथदिवे बंद आढळून आले.

याबाबत साधारणपणे दहा दिवस पाठपुरावा केल्यानंतर विद्युत विभागाच्या सहाय्याने पाच दिवे दुरूस्त तर बाकी बदलण्यात आले. त्यामुळे रस्ते उजळले आहेत.

रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष रवि नांगरे म्हणाले की, “पथदिवे किंवा ड्रेनेज लाईन, रस्ते, पिण्याचे पाणी या नागरिकांच्या प्राथमिक गरजा आहेत. त्या व्यवस्थितपणे मिळणे त्यांचा हक्क आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रत्येक अडचणीसाठी आम्ही नेहमीच उपलब्ध असणार आहे. दरम्यान, परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या असून याबाबत लवकरच महापालिका आयुक्तांना निवेदन देणार आहे.”