माहिती व जनसंपर्क खात्यामुळेच जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचू शकतात | जीवनगौरव विजेत्या वीणा गावडे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

माहिती व जनसंपर्क खात्यामुळेच जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचू शकतात | जीवनगौरव विजेत्या वीणा गावडे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री म्हणजेच राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येते आणि त्या माध्यमातून लोकहिताचे निर्णय जनते पर्यंत पोहोचविता येतात. मला या विभागात काम करण्याची संधी मिळाली आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांच्या समवेत चर्चा करण्याचा, त्यांची, पर्यायाने सरकारची भूमिका जनतेसमोर सादर करण्याची संधी मिळाली. या माझ्या कार्याची नोंद घेऊन धडाकेबाज अशा शीतलताई करदेकर यांनी एनयुजे, महाराष्ट्र या लढाऊ संघटनेमार्फत मला जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार माझ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचाच आहे असे मी मानते, अशा शब्दांत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक संचालक श्रीमती वीणाताई गावडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

एनयुजेने जीवनगौरव पुरस्कारासाठी माझ्या नावाची निवड केली त्याबद्दल प्रथमतः एनयुजेचे, या संस्थेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते असे सांगून वीणाताई गावडे पुढे म्हणाल्या की, जनसंपर्क क्षेत्रासाठी मला हा पुरस्कार देण्याचे या संघटनेच्या रणरागिणी शीतल करदेकर यांनी ठरविले हा माझा आणि किंबहुना या क्षेत्राचाच बहुमान आहे. माझा पुरस्कार हा या क्षेत्राचाच पुरस्कार आहे. मी निमित्तमात्र आहे. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सुमारे चाळीस वर्षे सेवा बजावतांना अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री पूर्वी उपमंत्रीही होते अशांकडे काम करण्याची संधी मिळाली. बरेच काही शिकायला मिळाले. हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. अगदी डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. काही खुट्ट म्हणून झालेले चालत नाही. मंत्र्यांना भाषणे लिहून देणे, त्या त्या विभागाची सांगोपांग, सर्वंकष माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार चौकस पद्धतीने आम्हाला काम करावे लागत होते. त्यावेळी आतासारखी साधने नव्हती त्यामुळे कष्ट घेण्याची सवय लागली. आधुनिकीकरण झाले, समाजमाध्यम झपाट्याने वाढू लागले. आता तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री एवढेच काय आमदारांकडेही जनसंपर्क अधिकारी आहेत. खाजगी संस्थाही हे काम करतात. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरचा ताण कमी झाला, असे वाटत असेल तर ते बरोबर नाही. कारण या यंत्रणेतही आमूलाग्र बदल घडले आहेत. कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी वृत्तवाहिन्या कमी होत्या. आमच्या काळात तर आकाशवाणी आणि दूरदर्शन एवढेच होते. वृत्तसंस्था होत्या. आता हे जाळे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जबाबदाऱ्या सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे कामाची जाणीव, जबाबदारीची जाणीव, ठेवून काम करणे गरजेचे आहे.

बेफिकिरी, बेजबाबदारपणा हे चालणार नाही. आधुनिकता आली की या माध्यमाचे हत्यार हे दुधारी शस्त्रासारखे आहे. त्याचा वापर योग्य त्या पद्धतीने करायला हवा. आता सारेच सूज्ञ आहेत, त्यामुळे मी बोजड मार्गदर्शन करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांना काही सांगणे योग्य होणार नाही. सर्वांना शुभेच्छा देतांना प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने आपापली कर्तव्ये पार पाडावीत या अपेक्षा व्यक्त करते. पुनश्च आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि मला या पुरस्कारायोग्य मानल्याबद्दल संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त करते. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे शीतल करदेकर या जे उत्कृष्ट कार्य करीत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. असे नेतृत्व असेल आणि त्यांना सर्वांची साथ मिळाली तर ही संस्था अल्पावधीत झपाट्याने यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही. ही संस्था चिरकाल टिकावी आणि तिचा आदर्श सर्वच सामाजिक व अन्य क्षेत्रांनी घ्यावा ही मनःपूर्वक प्रार्थना. आजचा गौरव हा माझ्या इतकाच माझ्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे, असं मी मानते, या विभागामुळेच मुख्यमंत्री, मंत्री, सचिवांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची सुसंधी मिळाली. शासनाने जनहिताचे घेतलेले निर्णय, उपक्रम जनतेपर्यंत लवकरात लवकर आणण्यात संपर्क अधिकारी आजही पुढेच आहेत आणि यापुढेही पुढेच राहतील. समाज माध्यमेही आज सक्रीय झाली आहेत त्याचीही दखल संपर्क अधिकार्‍यांनी घेणं गरजेचं आहे, असेही मत यावेळी बोलताना वीणाताई गावडे यांनी व्यक्त केले.