पिंपरी : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील महानगरपालिकेचे प्रसिद्ध लिनियर गार्डन (Linear Garden) दारूड्यांचा अड्डा बनले असून दिवसाढवळ्या तळीराम येथे पार्टी करताना दिसतात. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याने पोलीस प्रशासनाने या दारूड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने हे प्रशस्त व सुंदर गार्डन विकासीत करण्यात आले आहे. या गार्डनमध्ये महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक येतात. मात्र, दारूड्यांचा येथे वावर वाढला असून दिवसाढवळ्या ते गार्डनमध्ये दारू पिताना दिसतात.
दरम्यान, अशा प्रकारचे किळसवाणी दृश्ये पाहून गार्डन मध्ये येणाऱ्या मुलांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे कायद्याने गुन्हा असून पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी परिसरातील नागरिकांची आग्रहाची मागणी आहे.