कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या ‘रेखाचित्रे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या 'रेखाचित्रे' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पिंपरी : कवी अनिल यांच्या म्हणण्यानुसार सध्या काव्याच्या प्रांतात भिन्न मतांतरांमुळे गोंधळ आहे. नव समीक्षकांचा ‘वाटते पंथ’ उदयास आला आहे. मात्र नवकवींनी अशा टिकाकारांकडे लक्ष न देता कविता लिहिल्या पाहिजेत. कारण ज्याच्यापाशी हृदय आहे, तोच माणूस कविता लिहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, कवी, गझलकार प्रदीप निफाडकर यांनी केले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे प्रा. सौ. रेखा पिटके- आठवले यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ आणि ‘काव्यरेखा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले, यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर मीडिया कन्सल्टंट गिरीश केमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कवी असणं हे सौभाग्याचं लक्षण असतं, असे सांगून निफाडकर पुढे म्हणाले की पाश्चात्य कवी जेराल्ड हॉपकिन्स यांनी अत्यंत मार्मिक शब्दात कविता ही कानांनी वाचण्याचा सल्ला दिला होता. कविता कानांनी वाचण्याची आणि डोळ्यांनी ऐकण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते.

मीडिया कन्सल्टंट गिरीश केमकर यांनी ‘काव्यरेखा’ काव्यसंग्रहात ८८ कविता अत्यंत सहजसुंदर, नितळ आणि निरपेक्ष भावनांनी सादर केल्याबद्दल कवयित्रींचे अभिनंदन केले. कलाकार म्हणून जगण्याचा समृद्ध मार्ग निवडत असताना कलेची साधना कधी सोडू नये. कलाकाराने आत्मसंवाद जपायला हवं. सध्याच्या इंटरनेट युगात कौटुंबिक संवाद हरवत चालल्याची खंत व्यक्त करत केमकर पुढे म्हणाले की, हा कोरडेपणा नाहीसा करण्यासाठी जगणं व्यक्त करणाऱ्या कवितांची निर्मिती होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्यात ‘श्यामची आई’ दिसल्याची प्रांजळ कबुली दिली. यावेळी त्यांनी पोलिसांवरील कविता ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ ही कविता सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आठवले यांच्यासह पत्रकार रोहित आठवले, अॅड. अक्षया आठवले, रश्मी अस्थाना आदींसह काव्यरसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.