बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा घेण्याचा उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये सुरू

बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा घेण्याचा उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये सुरू
  • मुख्यमंत्री कार्यालयाने तक्रारदाराच्या पत्राची घेतली दखल

पिंपरी : स्मार्ट सिटी, आयटी सिटी, मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) नावारूपाला येत आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले असून जमिनीचे खरेदी, विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. यामध्ये काही लोकांचा बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड मध्ये वाढत आहेत. असाच एक प्रकार ताथवडे येथील (सर्वे नंबर १६१ चा ४ आणि ५ क्षेत्र ७० आर) आसवानी असोसिएट्सचे भागीदार श्रीचंद आसवानी (Shrichand Asawani) यांच्या बाबत वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याची माहिती श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, आसवानी असोसिएटच्या नावे ताथवडे येथील सर्वे नंबर १६१ मधील ४ आणि ५ मधील जागा ओव्हाळ कुटुंबीयांकडून आम्ही २८/२/२००८ रोजी दस्त नोंदणी क्रमांक १०१२/२/२००८ च्या सूची क्र. २ नुसार रितसर खरेदी केली आहे. त्यानंतर आम्ही आमच्या खर्चाने त्याजागेवर वॉल कंपाऊंड केले, एक वॉचमन खोली उभारली, तेथे एमएसइबीचे कनेक्शन घेतले आहे. या सर्व बाबींच्या व्यवहाराच्या व पावत्या आमच्याकडे आहेत. जागेचा रितसर ताबा देखील आमच्याकडे आहे. असे असतानाही किरण प्रकाश बुचडे, संजय आगेलू, तुषार पवार, हरीश मगारामजी माळी आणि एक अनोळखी इसम यांनी आमच्या अनुपस्थितीत वरील नमूद जागेवरील कंपाऊंडचे गेट तोडून वॉचमन लक्ष्मण रेखटवाल यांच्या पत्र्याच्या निवाऱ्याचे तोडफोड करून नुकसान केले व वॉचमनला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ५ ऑगस्ट) सकाळी ६:४५ च्या सुमारास घडली. यावेळी संबंधितांनी सीसीटीवीचे कनेक्शन तोडले. याबाबत आम्ही ११२ नंबरवर फोन केल्यानंतर पोलिस येताच किरण बुचडे व तुषार पवार सह बाकीचे लोक पळून गेले. याची रितसर तक्रार आमचे साईट सुपरवायझर रामकिसन सखाराम पारटकर यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे (एफआयआर नंबर. 0680 दि. 05/08/2022) रात्री ९ वाजता केली आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही खरेदी केलेले जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून आमचे आर्थिक नुकसान व आमच्या वॉचमनला मारहाण करणाऱ्या किरण बुचडे व त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही भारतीय दंड संहिता १८६० नुसार 452, 121, 504, 506, 427, 141, 143, 148, 149, 37(1), 37( 3) नुसार तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रशासन आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून झालेल्या प्रकाराबाबत संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आसवानी असोसिएट्सचे भागीदार श्रीचंद आसवानी यांनी केली आहे.

याबाबत आम्ही मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी शहर, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड शहर, पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन यांच्याकडे रितसर तक्रार अर्ज दिला आहे. या आमच्या अर्जाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून तो अर्ज पुढे गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. बेकायदेशिररित्या किरण बुचडे आणि त्यांचे सहकारी आमच्या जमिनीवर प्रवेश करून आमचे कामगारांना मारहाण करतात याबाबत आम्हाला रितसर न्याय लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे असे पत्र श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.