Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पुणे : उरूळी कांचनजवळील एका घरात भलामोठा साप शिरला, आणि सगळ्यांचीच पाचावर धारणा झाली. आतील सर्वांनी घराबाहेर पळ काढला. मात्र, घरातील खाटेवर असलेल्या वयोवृद्ध आजीजवळ दोन चिमुरड्यांनी आसरा घेतला. अशा घाबरलेल्या परिस्थितीत कोणालाच काही कळेना. त्याचवेळी सर्पमित्र लक्ष्मण पांचाळ यांना फोन करून कळविण्यात आले. लॉकडाऊन असतानाही पांचाळ व त्यांची पत्नी सीमा यांनी चिंचवड येथून 39 किलोमीटरचा प्रवास करत सापाला पकडून जंगलात सोडून दिले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

शनिवारी (ता. 25) दुपारी ही घटना घडली. उरूळी कांचन जवळील महाराजा आकादमी येथे एका घरात सुमारे सात फुट लांबीचा साप शिरला. त्यावेळी सर्वांनीच घरातून धुम ठोकली. मात्र, दोन चिमुरड्यांनी घरातच खाटेवर असलेल्या आजीजवळ जीव मुठीत धरून आसरा घेतला. सर्वांचा आरडाओरडा सुरू झाला. तोपर्यंत साप किचन ओट्याखाली जाऊन बसला होता. साप बाहेर येऊ नये म्हणून काहींनी घराचा दरवाजाही बाहेरून बंद केला.

दरम्यान, याबाबत सर्पमित्र लक्ष्मण पांचाळ यांना कळविल्यानंतर पांचाळ यांनी चिंचवडवरून घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. पत्नी सीमा यांच्यासह ते पाऊन तासात घटनास्थळी पोचले. त्यांनी घरातच सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप निसटून बाहेर आडळीत शिरला. पांचाळ यांनी सापाला मोठ्या शिताफिने पडून पिशवीत बंद केले. त्यावेळी तो साप धामिन जातीचा असल्याने समोर आले.

लॉकडाऊन असताना व ऐवढा लांबून स्वखर्चाने प्रवास करत साप पकडल्याने सर्वांनी पांचाळ यांचे आभार मानले. तसेच पैसेही देऊ केले. मात्र, पांचाळ यांनी पैसे स्विकारले नाहीत. विशेष म्हणजे पांचाळ यांच्या पत्नीही साप पकडण्यात पटाईत आहेत.