महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी, ता. 26 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता, थेरगाव, सांगवी व यमुना नगर रूग्णालायातील कंत्राटी पद्धतीने नेमलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे 350 कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. ठेकेदार त्यांना वेळेवर पगार देत नसून फेब्रुवारीपासून त्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले असून आज जिजामाता रूग्णालयात या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून महापालिका प्रशासानाला जागे केले. दोन दिवसात वेतन देण्याचे ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले.

श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. असे या ठेकेदाराचे नाव असून 1 ऑक्टोंबर 2021 पासून या ठेकेदाराला महापालिकेने वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी पुरविण्यासाठी नेमले आहे. त्यासाठी स्थायी समितीने कोरोना निधी लेखा शिर्षकातून 4 कोटी 25 लाख 22 हजार 234 खर्चास मान्यता दिली असून या ठेकेदाराला दोन वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. मात्र, हा ठेकेदार या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देत नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरखर्च चालवणे जिकीरीचे झाले आहे. अनेकांचे घरभाडे रखडल्याने त्यांच्यावर घर सोडण्याची वेळ आली आहे. अशी व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली.

याबाबत जिजामाता रूग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे म्हणाल्या की, ठेकेदाराकडून स्टाफचे पेमेंट रखडले असल्याने त्यांनी सकाळी काम बंद आंदोलन केले . मात्र, त्याचा ओपीडी व रूग्णसेवेवर आम्ही परिणाम होऊ दिला नाही. उद्या पेमेंट केले जाणार असल्याबाबत ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले.

ठेकेदाराने महापालिकेकडे हजेरीच पोहचवली नाही
संबंधित ठेकेदाराने दोन महिने कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे, हजेरी महापालिकेकडे पोहचवली नाही. त्यामुळे ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आली नाही. आज ठेकेदाराचे प्रतिनिधी व कर्मचारी यांच्यासोबत मिटींग झाली. त्यावेळी दोन दिवसात पेमेंट देणार असल्याबाबत ठेकेदाराने लेखी दिले आहे. वेतन दिरंगाईबाबत ठेकेदारावर कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त निर्णय घेतील. असे महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.