दोन खुनाच्या गुन्ह्यातील नातेवाईकाच्या मदतीने सुनेनेच काढला सासुचा काटा | मृतदेहाची लावली विल्हेवाट

दोन खुनाच्या गुन्ह्यातील नातेवाईकाच्या मदतीने सुनेनेच काढला सासुचा काटा | मृतदेहाची लावली विल्हेवाट

रहस्यमय खुनाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट – २ ने केला उलगडा

पिंपरी : सासुचा खुन करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या सुनेला तिच्या नातेवाईकाला गुन्हे शाखा युनीट – २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या नातेवाईकावर दोन खुन केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पॅरलवर बाहेर आहे.

कोणताही ठोस पुरावा हाती नसताना गुन्हे शाखा युनीट – २ च्या पथकाने या खुनाचा उलगडा केला आहे. पथकाच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करुन पथकाला ४० हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे.

इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख (वय – २५, रा. फाजीमा मस्जिद जवळ, ओटास्किम, निगडी) असे खुन केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. तर आरोपी सुन ही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सोजराबाई दासा जोगदंड ( वय- ७०, रा. उर्दु शाळेजवळ, लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे ) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे.

या प्रकरणी मृताची मुलगी लतीका वसंत गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात मिसिंग ची तक्रार नोंद केली होती. हि घटना बुधवार (ता. १४ जुलै) रोजी येरवडा परीसरात घडली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींने मृतदेह देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुना-मुंबई महामार्गा जवळील झाडा-झुडपात फेकुन दिला होता. पोलीसांना मृतदेह सोमवार (ता.२३) रोजी रात्री देहुरोड महामार्गा जवळ झाडा-झुडपात चादरीत बांधलेला कुजलेल्या आवस्थेत मिळुन आला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलेचा मृतदेह चादरीत बांधलेला कुजलेल्या आवस्थेमध्ये मिळुन आला होता. हा प्रकार खुनाचा असल्याने देहुरोड पोलीस आणि गुन्हे शाखा युनीट – २ चे पथक यांनी समांतर तपास सुरु केला. तपास सुरु असताना गुन्हे शाखा युनीट – २ च्या पथकातील पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना माहिती मिळाली की, सदर मृतदेह हा येरवडा भागात राहणाऱ्या सोजराबाई जोगदंड या वयोवृद्ध महिलेचा आहे. तिची सुन आणि तिचा नातेवाईक सराईत गुन्हेगार इम्तियाज शेख या दोघांनी मिळुन खुन केला आहे. आरोपी हा ओटास्किम परीसरात संशयितरित्या फिरत असताना पथकाने त्याला शिताफिने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने व त्याची आरोपी मावशी यांनी मिळुन तिच्या सासुचा गळा दाबुन खुन केला असल्याची पोलीसांना कबुली दिली. मुलाने आंतरजातीय केलेला विवाह तसेच पाच एकर जमीन विक्रीतुन मिळालेला पैसा या गोष्टीमुळे सासु-सुनेत वारंवार भांडण होत होती. त्यामुळे सुनेने सासुचा कायमचा काटा काढण्यासाठी आरोपी इम्तियाज शेख याला सांगितले असल्याचे पोलीस तपासात माहिती मिळाली आहे.

आरोपी इम्तियाज शेख याच्यावर २०१७ मध्ये निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. त्यावेळी त्याला बेल मिळाली होती. तसेच २०१८ मध्ये खडकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. एक वर्षापासुन तो पॅरल वर बाहेर आहे. मागील महिन्यामध्ये त्याच्या मावशीने त्याला फोन करुन सासुला संपवायचे असल्याचे सांगितले होते.

न्यायालयाने आरोपीला पुढील तपास कामी सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा येरवडा परीसरात घडल्यामुळे पुढील तपास कामी हा गुन्हा येरवडा पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखा युनीट – २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार जमीर तांबोळी, प्रमोद वेताळ, विपुल जाधव, जयवंत राऊत, नामदेव राऊत, दिलीप चौधरी, केराप्पा माने, शिवानंद स्वामी, अजित सानप यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.