कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका

कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका

कर्जत, ता. १९ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने १५ जागेवर एकहाती विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला. माजीमंत्री राम शिंदे यांना अवघे दोनच जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांनी राम शिंदेना पराभवाचा झटका देत कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तातंर घडविले. कर्जतकरानी राम शिंदे यांनी प्रचारादरम्यान आ. रोहित पवार यांच्यावर दहशतीच्या राजकारणाचा केलेला आरोप खोडून काढला. सर्वच विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचे आशीर्वाद घेत जल्लोष केला. मात्र, राष्ट्रवादीच्या मनीषा सोनमाळी यांचा प्रभाग क्रमांक चारमधील पराभव राष्ट्रवादीस जिव्हारी लागला.

कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ८१.८७% मतदान संपन्न झाले होते. या सर्व जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात दोन फेरीत संपन्न झाली. अवघ्या पाऊण तासातच प्रशासनाने कर्जत नगरपंचायतीचा निकाल घोषित केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जतच्या मतदारांनी सर्वाधिक पसंती देत प्रथम क्रमांकाने निवडून देत तब्बल १२ जागेवर विजय मिळवून दिला. तर आघाडीचा घटक पक्ष काँग्रेसने तिन्हीच्या तिन्ही जागेवर विजय मिळवत साथ दिली. त्यामुळे आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १७ पैकी १५ जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपाच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत आपल्या ताब्यात घेत सत्तापरिवर्तन केले. या निवडणुकीत माजीमंत्री राम शिंदे आणि खा सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाला अवघ्या दोनच जागेवर विजय मिळवता आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक १० च्या बेलेकर कॉलनीच्या उमेदवार उषा अक्षय राऊत यांनी तब्बल ५३० मताच्या फरकाने विजय मिळवला. तर सर्वात कमी १४ मतांनी याशीन-नगर प्रभागातील भाजपाचे उमेदवार गणेश क्षीरसागर यांना काँग्रेसच्या मोनाली तोटेकडून पराभव स्वीकारावा लागला. तसेच प्रभाग क्रमांक १४ सोनारगल्लीमध्ये भाजपाच्या उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. त्या ठिकाणच्या मतदारांनी तब्बल १५० मतदान नोटाला केल्याने नोटांचा सर्वाधिक मताचा विक्रम नोंदविला गेला. विद्यमान नगरसेवक असणाऱ्या मनीषा सोनमाळी आणि बापूसाहेब नेटके यांच्या स्नुषा यांना मात्र यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

विजयी उमेदवार आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रभागनिहाय पडलेली मते खालीलप्रमाणे:

प्रभाग क्रमांक-१ (गायकरवाडी) ज्योती लालासाहेब शेळके – (राष्ट्रवादी -४६१ विजयी), वंदना भाऊसाहेब वाघमारे (भाजपा १९३). प्रभाग क्रमांक- २ (जोगेश्वरवाडी) लंकाबाई खरात – राष्ट्रवादी (बिनविरोध)( प्रशासकीय निकाल राखीव). प्रभाग क्रमांक-३ (ढेरेमळा) संतोष सोपान म्हेत्रे (राष्ट्रवादी ५५४ विजयी), रावसाहेब पंढरीनाथ खराडे (भाजपा ३५२), शांता मुकींदा समुद्र (७०). प्रभाग- ४ (माळेगल्ली) अश्विनी गजानन दळवी (भाजपा ४३९ विजयी), मनीषा सचिन सोनमाळी (राष्ट्रवादी २७२), आशाबाई बाळासाहेब क्षीरसागर (२७). प्रभाग क्रमांक ५ पोस्ट ऑफिस परिसर : रोहिनी सचिन घुले (काँग्रेस ४७४ विजयी), सारिका गणेश क्षीरसागर (भाजपा १४२). प्रभाग क्रमांक ६ (यासीननगर) : तोटे मोनाली ओंकार (काँग्रेस २२५ विजयी), गणेश नवनाथ क्षीरसागर (भाजपा २११), दिनेश बाळू थोरात (शिवसेना१६). प्रभाग क्रमांक ७ (बुवासाहेब नगर): सतीश उध्दवराव पाटील – (राष्ट्रवादी ३२३ विजयी), दादासाहेब अर्जुन सोनमाळी (भाजपा २८९), शिवानंद लक्ष्मण पोटरे(११). प्रभाग क्रमांक ८ (शिक्षक कॉलनी) : भाऊसाहेब सुधाकर तोरडमल – (काँग्रेस ४९९ विजयी), बबन सदाशिव लाढाणे (भाजपा ११४). प्रभाग क्रमांक ९ (समर्थनगर) : अमृत श्रीधर काळदाते (राष्ट्रवादी ३५५ विजयी), उमेश शंकर जपे (भाजपा १५७), सोमनाथ हरी भैलुमे (वंचित ५).

प्रभाग क्रमांक १० (बेलेकर कॉलनी) : उषा अक्षय राऊत (राष्ट्रवादी ६४४ विजयी), मोनिका अनिल गदादे (भाजपा११४). प्रभाग११ (बर्गेवाडी) : पिसाळ मोहिनी दत्तात्रय (भाजपा २९८ विजयी), नेटके एशवर्या विजय (राष्ट्रवादी २६१). प्रभाग क्रमांक १२ (शहाजीनगर): राऊत नामदेव चंद्रकांत (राष्ट्रवादी ६४८ विजयी), शरद रामभाऊ मेहेत्रे (भाजपा३२५). प्रभाग क्रमांक १३(गोदड महाराज गल्ली): सुपेकर रविंद्र सुवर्णा (राष्ट्रवादी ३२७ विजयी), शिंदे वनिता परशुराम (भाजपा २३९). प्रभाग क्रमांक १४ (सोनारगल्ली): कुलथे ताराबाई सुरेश (राष्ट्रवादी ३३२ विजयी), NOTAवरील पैकी एकही नाही (१५०), सय्यद शिबा तारेक (भाजपा ११). प्रभाग क्रमांक १५ (भवानीनगर) : भास्कर बाबासाहेब भैलुमे (राष्ट्रवादी ४६४ विजयी), संजय शाहूराव भैलुमे (भाजपा २७३). प्रभाग क्रमांक १६ (अक्काबाईनगर) : प्रतिभा नंदकिशोर भैलुमे (राष्ट्रवादी ३६१ विजयी), सुवर्णा विशाल काकडे (भाजपा १९२). प्रभाग क्रमांक १७ (भांडेवाडी) : छाया सुनील शेलार (राष्ट्रवादी ७२६ विजयी), अनिल मारुती गदादे (भाजपा ४९६).

मनीषा सोनमाळी यांचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी

माळेगल्ली प्रभाग क्रमांक ४ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि कार्यक्षम नगरसेविका मनीषा सोनामाळी यांना भाजपाच्या आश्विनी दळवी-गायकवाड यांच्याकडून १६७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला. सोनामाळी या आ रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या निकटवर्तीय म्हणून गणले जात होत्या.

पक्षीय बलाबल

सन २०१५ सन २०२१

भाजपा – १२ राष्ट्रवादी काँग्रेस – १२

काँग्रेस – ०४ काँग्रेस – ०३

अपक्ष – ०१ भाजपा – ०२