सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती

सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती

रोहित आठवले

घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरून अपहरण झालेला मुलगा पूनावळे येथे बांधकाम साईट वर सोडून देण्यात आला. पिंपरी चिंचवडकरांनी अंडरवर्ल्डचा अपहरणाशी संबंध ते अनेक प्रकरणात कोर्टात कुटुंबाने साक्षी फिरवण्याच्या घटना पाहिल्या आहेत.

डूग्गुला पूनावळेमध्ये कोणी सोडले. या प्रकरणात जवळच्या कोणाचा सहभाग आहे का हे पोलिसांच्या तपासातून पुढे येईल. पण तो पर्यंत सोशल मीडियावर झालेला अतातायीपणा कसा घडला आणि आरोपी कुठे कुठे फिरला ते वाचूयात…

डूग्गुच्या जीवावर बेतणारे आणि पोलिसांना तपासात व्यत्यय येईल असे अँटी सोशल काम सोशल मीडियाद्वारे अनेकांनी मागील काही दिवसात केले आहे. पत्रकारांना बातमीची कायमच जीवघेणी स्पर्धा असतानाही एकानेही ब्रेकिंग अथवा तपास कसा सुरू आहे, तपास का थंडावला, तपासात कुठे कोण चुकले या बातम्या केल्या नाहीत. याला दोन तीन अपवादही ठरले. मात्र, सोशल मीडियाचा घातक चेहरा या प्रकरणाने पुन्हा एकदा समोर आला आहे.

शोधपात्रिका म्हणून बालेवाडी हायस्ट्रिट येथून अपहरण झालेल्या मुलाचा (डूग्गु) फोटो आणि माहितीची देवाण घेवाण अत्यंत मुक्त हस्ते मागील दहा दिवसांपासून फेसबूक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू होती. ११ जानेवारी ते १९ जानेवारी हा खूप मोठा कालावधी होतो. त्याचे आई वडील काकुळतीला येऊन डूग्गु सापडावा म्हणून स्वतः फेसबूक वर काही गोष्टी पोस्ट करीत होते.

त्याला कारण म्हणजे चार – पाच दिवसांनी पण पोलिसांच्या तपासात कोणतीच प्रगती दिसत नव्हती. मात्र, या पोस्ट कॉपी पेस्ट करणे, ते फोटो उचलून आपल्या नेत्याचा फोटो – नाव खाली जोडून नीच प्रसिध्दी मिळविणे असले प्रकार काही लोकांनी केले.

एका प्रतिथयश मराठी वृत्तपत्राच्या वेब पोर्टल ने तर पोलिसांकडून याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळजी जात असल्याची बातमी प्रसिद्ध (अपलोड) केली. तर एक दोन न्यूज चॅनलची आमदारांनी, स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन आव्हान केल्याची बातमी करून लाळ घोळेपणा सुरू ठेवला होता.

डूग्गु याला भर दिवसा दुचाकीवरून उचलून (पुढे उभे करून) नेण्यात आले. आरोपी ओळखीचा असावा, तो मुलगा की मुलगी असावी याचा निष्कर्ष काढण्यात पोलिसांचा बराच वेळ गेला होता. त्यात परत जी दुचाकी ॲक्टिव्हा वापरण्यात आली तिचा नोंदणी क्रमांक अर्धवट दिसत होता. त्यामुळे किमान ५०० लोकांना घरी जाऊन तपासण्यात आले.

राज्य शासनाने आणि महापालिकेने खर्च केलेले पैशातून ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद असल्याचे या तपासातून पुढे आले आहे. धक्कादायक म्हणजे वर्दळ आणि महत्वाचे ठिकाण असलेले मिटकॉन, हाईस्ट्रिट, सदानन हॉटेल चौक येथील सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे निगडी असो वा नागपूर मधील अपहरण प्रकरण पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चिले गेले.

निगडी मधील अपहरण पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होण्यापूर्वीच आहे. तेव्हा जी सांघिकता तपासात दिसून आली ती या प्रकरणात नव्हती. मुलगा सुखरूप परत मिळेपर्यंत कोणी घरी गेले नव्हते पण आज तसे झाले नाही. मुलाबाबत काही माहिती मिळाली की पोलिस स्टेशन चे अधिकारी हुशार की गुन्हेशाखा असा कलगीतुरा तेव्हा पाहायला मिळाला नव्हता. एकाच ठिकाणी ५०-५० अधिकारी गर्दी करीत नव्हते.

निगडीत झालेल्या प्रकारानंतर स्थानिक पोलिस ठाण्याचे दोन्ही निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक, दोन्हीकडचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त चार दिवस पोलिस चौकी शेजारील इमारतीत (आरोपींना समजू नये म्हणून तेथून सर्व तपास यंत्रणा कार्यरत होती) मुक्कामी होते असो…

नागपूर येथील प्रकरणात स्थानिक लोकांनी एका प्रकरणात सोशल मीडियावर अपहरण झालेल्या मुलाची माहिती एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर केली की त्यात त्या मुलाचा बळी गेला होता. किमान यापुढे तरी नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे. हा मेसेज सात जणांना पाठवा किंवा शेअर करा आणि रिझल्ट पाहा.. असले उद्योग ठीक आहेत. पण एवढं सोपे नसते अपहरण प्रकरण हाताळले किंवा त्याचा तपास करून अपहरण झलेल्याला सुखरूप परत आणणे..

सीसीटीव्ही ने घात केला

आरोपी डूग्गु याला उचलून नेण्यापूर्वी कुठून कसा कसा आला हे पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये मिळाले. मात्र, आरोपी ज्या ज्या ठिकाणी पोहचले तेथे पोलिसांना जायला सात दिवस उशीर झाला होता. डूग्गु घेऊन आरोपी काही अंतर पुढे गेल्यावर मिटकॉन, हाईस्ट्रिट आणि अन्य काही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांनी तपासात लक्षात आले. आरोपी मिटकॉन, सरळ मार्गाने सना लॉज, तेथून राधा चौक मार्गे वाकड मार्गे, भूमकर चौक, देहूरोड ब्रीज, निगडीतील प्रसिद्ध हॉटेल, त्रिवेनिनगर, तळवडे, चिखली आणि सोनावणे वस्ती मधील एक दूध डेअरी एवढंच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले. ११ तारखेचे दुपार पर्यंतचे सोनावणे वस्ती येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. पण पोलिस या ठिकाणी १८ तारखेला पोहचले होते. याला कारण म्हणजे जेथे जेथे सीसीटीव्ही बंद होते तेथून पोलिसांचा तपास चार दिशेला विखुरला जात होता. पण त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना मदतीला घेऊन काही परिसरात एक एक घर अन् घर तपासण्यात आले.