हडपसर (प्रतिनिधी) : विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ या उपक्रमांतर्गत दोन व्याख्यानांचे व एक दिवसीय कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखा हडपसरच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे उपस्थित होत्या. त्यांनी ‘महिला संरक्षण, कायदे व नियम’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कायद्याने आपल्याला संरक्षण दिले आहे. त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा. नवीन गोष्टी शिकत राहा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. अशा स्वरूपाचा संदेश पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी दिला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, येथील कॉमर्स विभागातील प्रा. असावरी शेवाळे मॅडम यांनी ‘व्यावसायिक उद्योजकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या चांगला उद्योजक होण्यासाठी साहस, आत्मविश्वास, बांधिलकी, जबाबदारी, बुद्धीचे सामर्थ्य, चारित्र्यसंपन्नता, संवाद कौशल्ये इतर गुणांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक क्षमतेचा वापर करून उद्योग क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करावे. असे मत प्रा. असावरी शेवाळे यांनी व्यक्त केले.
एकदिवसीय कराटे प्रशिक्षण कार्यशाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी साधना महाविद्यालयाचे कराटे प्रशिक्षक विजय फरगडे व त्यांची कराटे प्रशिक्षण देणारी टीम उपस्थित होती. विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण करत असताना कोण-कोणत्या उपायांचा वापर करावा यासंदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून कराटे प्रशिक्षक विजय फरगडे सरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थिनींना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे. तसेच त्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा. तसेच विद्यार्थिनींना नवीन गोष्ट निर्माण करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘निर्भय कन्या अभियान’ हा उपक्रम घेण्यात आल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय जडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे, कॉमर्स विभागप्रमुख डॉ. अर्जुन भागवत, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल चौरे, डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. ज्योती किरवे, प्रा. संगीता यादव, प्रा. दत्ता वासावे, प्रा. सुशांत मोकळ, प्रा. ऋषिकेश खोडदे, प्रा. सोनाली शिवरकर, डॉ. रंजना जाधव, प्रा. सुवांजली भानगिरे, प्रा. इम्तियाज सय्यद व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.