पिंपरी : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने आठ दिवसात या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिका भवनात त्यांना आणून सोडण्यात येतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक दिवसांपासून शहरात विविध भागातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि अश्यातच रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. काही ठिकाणी तर लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही कुत्री येऊन अपघात होतात. तसेच दुचाकी वाहनाचा पाठलाग करणे असे प्रकार घडतात. अशा अपघातात अनेकांना मोठी दुखापत होते. यामधील काही जणांना तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर प्रवास करावा लागतो.
पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल तर आणि अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असेल, तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. येत्या आठ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर संभाजी ब्रिगेड महानगरपालिकेत मोकाट कुत्री आणून सोडेल याची नोंद घ्यावी. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते व पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.