PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते डांबरीकरणाच्या लेखी आश्वासनाचा अधिकाऱ्यांना पडला विसर

काळेवाडी (लोकमराठी) : विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेत नाही. विशेष म्हणजे रस्ते डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाकण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे घसरून पडण्याचे अपघात नित्याचेच झाले आहेत. नागरिकांचे हाल लक्षात घेता खोदकाम झालेल्या रस्त्यांचे महापालिकेने तातडीने डांबरीकरण करावे. अशी मागणी होत आहे.

दरम्यान, काळेवाडीतील रस्त्यांची दुरूस्ती व डांबरीकरणासाठी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना 1 नोव्हेंबर 2018, तर ‘ब’ क्षेत्रिय अधिकाऱ्यांना 1 डिसेंबर 2018 रोजी निवेदन देण्यात आले. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने 2 जानेवारी 2018 रोजी ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी 3 जानेवारी 2018 पासून श्रीकृष्ण कॉलनी 2, आझाद कॉलनी 1 व पंचनाथ कॉलनी मेन रोड आदी रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात येतील. असे लेखी पत्र ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या उपअभियंत्यांनी दिले. मात्र, अद्यापपर्यंत रस्त्यांची कामे झाली नाहीत. याबाबत राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर 15 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार करण्यात आली. त्याला उत्तर देताना सदर रस्त्यांवर ड्रेनेज वाहिनी टाकण्याचे काम प्रसंबित असल्याचे सांगण्यात आले. असे मनसेच्या महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाला काळेवाडीतील रस्ते दुरूस्तीची अनेकदा मागणी व तक्रार करूनही झोपलेल्या प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे महापालिका भवनासमोरच बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

अनिता पांचाळ, महिला उपशहराध्यक्षा, मनसे

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष