
- महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांकडून कौतुक
पिंपरी, दि. ९ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा प्रकारचा पहिलाच वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अबालवृद्धांनी घेतला. लहान मुले, महिलांचा देखील मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला.
वाहन मुक्त दिनानिमित्त रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम देखील येथे पार पडले. कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी आल्हाददायक अशी उपाययोजना करण्यात आली होती.
आजच्या कार्यक्रमास मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड,क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, राजेंद्र शिंदे,नितीन निंबाळकर,बाळू लांडे, विजय भोजने,सुनिल पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,उप अभियंता शिरीष पोरेड्डी,आयटीडीपी संस्थेचे प्रांजल कुलकर्णी,डिझाईन शाळेचे आशिक जैन,प्रसन्न देसाई आणि सहकारी यांच्यासह स्थानिक व्यापारी व दुकानदार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

झुंबा, हास्ययोग, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर, काल महिला दिनानिमित्त सायंकाळी नृत्यप्रदर्शन, सायकलींग,खेळ पैठणीचा, लाईव्ह संगीत, प्रश्नमंजुषा व अन्य मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
- अधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद
"चाय पे चर्चा" या कार्यक्रमात माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये संवाद साधण्यात आला. सार्वजनिक वाहतूकीस चालना देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.