पिंपरी: केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार अत्यंत निदर्यी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत. तसेच लखीमपुर येथील आठ शेतकऱ्यांची गाडी खाली चिरडून केलेल्या हत्येच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड यंदा दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमे ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करून दसरा साजरा करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सतिश काळे यांनी म्हटले आहे की, सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.तसेच सातत्याने होणारी गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, कोविड काळात फसलेले नियोजन, वाढती बेरोजगारी, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, कृषी व कामगार विरोधी कायदे, लखीमपुर येथील गाडी खाली चिरडून आठ शेतकऱ्यांच्या हत्या तसेच हाथरस प्रकरण या आणि अशा अनेक एककलमी कारभारामुळे जनता मोदी सरकारला कंटाळली आहे.
‘लोकशाही निर्णयप्रक्रियेवर मोदी सरकारचा विश्वास नाही आणि त्यामुळे देशातील सर्व लोकशाही संस्था निष्प्रभ करण्याचा कार्यक्रम सरकार नेटाने राबवत आहे. भाजपा सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील वर्षभरापासून लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत जवळपास सहाशे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असून असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बारा हजार रुपये भाव मिळत होता परंतु केंद्रातील भाजप सरकारने विदेशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करुन आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बारा हजार रुपये असलेला भाव चार हजार रुपयांवर आणून ठेवलेला असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले असल्यामुळे. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन येत्या शुक्रवारी दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०७ वाजता सोळा नंबर बसस्टॉप,थेरगाव येथे करण्यात येणार असल्याची माहिती सतिश काळे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते उपाध्यक्ष सतिश काळे सचिव विशाल जरे संघटक ज्ञानेश्वर लोभे यांच्या सह्या आहेत.