पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान

पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे यांचा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मान
  • हा पुरस्कार समाजातील दिनदुबळ्यांच्या चरणी अर्पण करतो; भिसे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

पिंपरी : जनसेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्ष लोकांची कामे करत आलो. परमेश्वराने दिलेल्या दोन हाताने दिनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच संधीचं सोणं झालं असून हा पुरस्कार त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे हा सन्मान पिंपळे सौदागरमधील दिनदुबळ्या, दिव्यांग, अंध-अपंग, ज्येष्ठ, कष्टकरी, कामगार वर्गातील नागरिकांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनी सेवा करण्याची संधी दिली नसती तर हा सन्मान घेण्याचा योगच आला नसता, अशी भावना उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय उर्फ आबा भिसे यांनी व्यक्त केली.

सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच, साकोसां महिला मंडळ, साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संजय उर्फ आबा भिसे यांना भाजपाचे युवा नेते शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आकुर्डीतील खंडोबा (माळ) मंदिर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, माधुरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

संजय भिसे म्हणाले की, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही केवळ पिंपळे सौदागरच नव्हे तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळून आदी भागात नागरिकांची कामे केली. पूर परिस्थितीत सांगली, कोल्हापूर येथील नागरिकांना खाद्य पदार्थ, कपडे वाटप केले. कोकणात देखील पूर परिस्थितीत मदत केली. कोरोना काळात पिंपळे सौदागरमध्ये प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या कुटुंबियांना खाद्यपदार्थ वाटप केले. पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले. रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात घरोघरी आरसेनिक अलबम गोळ्या वाटप केल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विद्यार्थी आदी सर्वांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.