काळेवाडी (लोकमराठी न्यूज) : निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे दि. १६ जुलै २०२३, रविवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत संत निरंकारी मिशनचा विशाल इंग्रजी माध्यम संत समागम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून ३००० पेक्षा अधिक संख्येने भाविक भक्त उपस्थित झाले होते, विशेषतः यामध्ये युवा संत जास्त संख्येमध्ये सहभागी झाले होते. आज निरंकारी मिशनचा संदेश जगातील ६० पेक्षा अधिक देशामध्ये पोहोचला आहे, इंग्रजी ही जागतिक भाषा असून निरंकारी मिशनची ही प्रेमाची शिकवण संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेमधून सत्संगाचे आयोजन करण्यात येते.
आपला जन्म या पृथ्वीवर आमच्या मर्जीने नाही तर परमात्म्याच्या इच्छेने झाला आहे, मनुष्य हि परमात्माची एक सर्वोत्तम रचना आहे आणि परमात्माला देखील जेव्हा अवतार घ्यायचा असतो तेव्हा मनुष्याच्याच रूपामध्ये प्रगट होत असतो असे उद्गार अशोक जुनेजा जी (भोपाळ) यांनी संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित इंग्रजी माध्यम संत समागमात संबोधित करताना व्यक्त केले.
मार्गदर्शन करताना त्यांनी समजावले कि आम्ही या पृथ्वीवर एक पाहुणे म्हणून आलेलो आहोत आणि आमचे या पृथ्वीवरून जाणे देखील निश्चित आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ज्या भौतिक वस्तूंची कमाई केली आहे तीच आपली संपत्ती आहे असा समज माणसाचा झाला असून मनुष्य देवाने दिलेल्या खऱ्या संपत्तीला विसरून गेला आहे. देवाने आपल्याला जो अनमोल देह दिलेला आहे हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे, आणि याचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे. मनुष्याला अनमोल जन्माची किंमत कळली नसल्यामुळे हा जन्म चुकीच्या पद्धतीने वाया घालवत आहे, संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच या जन्माची किंमत माणसाला कळते. निरंतर संतांचा संग केल्याने परमात्मा जरी निर्गुण, निराकार असला तरी त्याचा अनुभव माणसाला यायला लागतो आणि मी एक शरीर नसून माझं अस्तित्वच या निराकार ईश्वरामुळे आहे हि समज प्राप्त होते.
या विशाल सत्संगामध्ये अनेक युवा संतांनी इंग्रजी भाषेचा आधार घेऊन गीत, अभंग, विचार, नाटिका तसेच आध्यात्मिक प्रदर्शनी च्या माध्यमातून संत निरंकारी मिशनचा प्रेम आणि शांतीचा संदेश दिला. कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत-आभार पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी, पिंपरी सेक्टर प्रमुख गिरधारीलाल मतनानी यांनी केले.