पत्रकार शितल पवार यांना सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

पत्रकार शितल पवार यांना सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

पुणे : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीकडून दिला जाणारा सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादिका व पत्रकार शितल पवार यांना प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा पुरस्कार स्विकारल्यानंतर शितल पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या की, हा माझा सन्मान नाही तर माझ्यासह काम करणाऱ्या प्राची, रश्मी, मीनाक्षी, अक्षता, महिमा, गायत्री, तनिष्का अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे जबाबदारी आहे, स्वातंत्र्याचा वसा आपल्या आजूबाजूच्या सर्व मैत्रिणींपर्यंत नेण्याची. याची लख्ख जाणीव पुन्हा एकदा झाली. मला खात्री आहे आम्ही सर्व मिळून ही जबाबदारी नक्कीच पार पाडू.

आमच्या सभोवतालचे पुरूषही आमच्या विचारांचे आहेत, हा एक समाधानाचा भाग आहेच. यानिमित्ताने आम्हाला उत्तम शिक्षण देणाऱ्या, नोकरी आणि इतर सर्व निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या आई-वडील-नवरा- कुटुंब यांच्या ऋणात राहुयात. आज विशेष उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे नोकरी-घर सांभाळण्याचा कसरतीत माझ्या लेकराला आणि घराला जपणाऱ्या आशा ताईंचा. तुमच्या साथीशिवाय हे सगळं निव्वळ अशक्य आहे आणि मला याची पूर्ण जाणीव आहे.

शितल पवार पुढे म्हणाल्या की, खरं तर पत्रकार म्हणून मिळणारा कोणताही सन्मान किंवा पुरस्कार स्वीकारू नये असं नेहमीच वाटतं. माझं शिक्षण, ‘सकाळ’सारख्या दैनिकात दीर्घ प्रशिक्षणानंतर मिळालेली जबाबदारी, कामाचं स्वरूप हे सगळं बघता पत्रकार नाही तर माध्यम धोरण आणि व्यवस्थापन अशी भूमिका मी अधिक पार पाडत असते; पण यावेळी वरीष्ठ आणि अजित यांच्यासारख्या सहकाऱ्यांचा आग्रह आणि मुक्ता साळवे पुरस्कार म्हणून हा अपवाद. समानतेचा (Gender equality today for sustainable tomorrow) संदेश देणाऱ्या यावर्षीच्या महिला दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा!