धक्कादायक : साचलेल्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा | पादचारी मार्गाची श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथकाची मागणी

धक्कादायक : साचलेल्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा | पादचारी मार्गाची श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथकाची मागणी

मुंबई : बदलापूरच्या बेलवली परिसरामध्ये भुयारी मार्गात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी साचत असल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढत जावे लागते. नुकताच या मार्गातून वाट काढत अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

बेलवली परिसरातील रहिवासी रामचंद्र पाटील यांचे सोमवारी मध्यरात्री रात्री निधन झाले. मंगळवारी (ता. १४,सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी साचल्याने या मार्गातून अंत्ययात्रा नेताना नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. घडलेल्या या प्रकाराची माहिती सोशल मिडीयावर पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रेल्वेचे फाटक बंद केल्याने भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, या ठिकाणी साचणाऱ्या ड्रेनेजच्या घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढत ये-जा करावी लागते. त्यात पावसात आणखीनच भर पडते. या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असून रेल्वे मार्ग ओलांडणेही धोकादायक आहे. त्यामुळे सुव्यवस्थित पादचारी मार्गाची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथक (आम्ही बेलवलीकर) यांच्या वतीने होत आहे.