- कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन
कर्जत : ‘महिला-मुलींनो तुम्हाला जर कुणी ज्ञात-अज्ञात त्रास देत असेल तर मनात कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे पुढे या.कर्जतच्या पोलीस ठाण्यात किंवा तुम्हाला शक्य असेल त्या दुरक्षेत्रात तक्रार द्या.तुमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करून होणाऱ्या त्रासापासून तुमची कायमची सुटका केली जाईल’ असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
महिला-मुलींच्या सुरक्षीततेसाठी व त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी कर्जत पोलिसांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील अनेक शाळा-महाविद्यालयात जाऊन हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधला आहे. पोलीसांनी सुरू केलेल्या ‘भरोसा सेल’ तसेच अनेक उपाययोजनांची माहिती त्यांना पटवून दिली आहे.
पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी यासाठी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याची सहलही करण्यात आली. तक्रार कशी दाखल करावी? कोणाकडे करावी? तसेच त्यांना पोलिस करत असलेल्या कामांची व वेगवेगळ्या विभागांची माहिती देण्यात आली. ज्यावेळी महिला व मुलींवर अन्याय होतो, त्यावेळी अनेक मुली झालेल्या त्रासाबद्दल भीतीपोटी वाच्यता करत नाहीत.
सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेत स्पर्श करण्याचा प्रयत्न होतो, अश्लील हावभाव किंवा वाईट नजरेने खुणावले जाते. बस स्टँड किंवा बसेसमध्ये बसताना मुद्दाम जवळ बसण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न केला जातो.ओळखीच्या लोकांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडून सुद्धा खूप त्रास मुली आणि महिलांना सहन करावा लागतो. वेळोवेळी विनाकारण व्हाट्सएप वर तसेच फेसबुक वर मेसेज करून ही त्रास दिला जातो. मग मुली तो नंबर ब्लॉक करतात. मात्र, अशा घटनांना चाप बसवण्यासाठी कर्जत पोलिसांकडून गेली सात-आठ महिन्यांपासुन गांभीर्याने दखल घेतली जात आहे.
या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
महिला व मुलींच्या शेकडो तक्रारिंचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम कर्जत पोलिसांनी केलेले आहे. त्रास सहन करावा लागणाऱ्या महिला व मुलींना मिरजगाव दुरक्षेत्र, राशीन दुरक्षेत्र किंवा कर्जत पोलिस स्टेशन येथे म्हणजेच जेथे शक्य असेल तेथे आपली तक्रार देता येईल. ज्यांना शक्य नसेल त्यांना पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपला ९९२३६३०६५२ स्वतःचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. कोणतीही अनुचित घटना घडूच नयेत यासाठी घटनेपूर्वीच महिला व मुलींनी पोलिसांची मदत घ्यावी.
कुणीही घाबरू नका नाव गोपनीय ठेवले जाईल! होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करू की नको? समाज,मित्र-मैत्रिणी काय म्हणतील? घरचे काय म्हणतील? आपली शाळा, कॉलेज कायमचे बंद तर होणार नाही ना? हे सगळे विचार मनातून काढा.आता घाबरू नका,तुमचे नाव गोपनीय ठेऊन त्रास देणाऱ्यावर कडक कारवाई करू. तुमचे नाव तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोपनीय ठेवले जाईल कर्जत पोलिस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत पोलिस ठाणे