पत्रकारास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सुरेशकुमार राऊत

पत्रकारास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सुरेशकुमार राऊत

शिक्रापूर : एखाद्या बातमीचा राग मनात धरून पत्रकारांवर हल्ले करणे हि बाबत अतिशय चुकीची असून पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नसून सध्या पत्रकारास मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.

शिंदोडी ता. शिरुर येथील पत्रकार तेजस फडके यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्या संदर्भात बातमी केलेली असताना त्या बातमीचा राग मनात धरून गावातील काही समाज कंटकांनी तेजस फडके यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले होते.

याबाबत तेजस फडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत शिरूर तालुक्यातील पत्रकारांनी नुकतीच पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची भेट घेत, आरोपींना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार सचिन धुमाळ, रवींद्र खुडे, विशाल वरपे, प्रमोद लांडे, शंकर पाबळे, शेरखान शेख, विजय थोरात, संपत कारकूड, शोभा परदेशी, अरुणकुमार मोटे, अनिल सोनवणे, रमेश देशमूख यांसह आदी उपस्थित होते.

तर यावेळी बोलताना पत्रकार तेजस फडके यांच्यावर हल्ला करत मारहाण केल्याप्रकरणी आम्ही अकरा जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले असून या गुन्ह्यात पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे तसेच इतर आरोपींना देखील आम्ही तातडीने अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र पत्रकारांवर हल्ले करून पत्रकारांना दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करणाऱ्यांची गय करणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे देखील यावेळी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले आहे, सदर गुन्ह्याचा पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहे.