महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य

महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य
  • जनतेसाठी अभिप्राय फॉर्म ठेवण्याचे मा आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

पिंपरी : मनपामधील विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना अधिकाऱ्यांचा उर्मटपणा मुजोरपणा अनुभवास येतो, बरेचदा अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात, असले तरी नागरिकांची भेट नाकारतात. त्यांना तासन तास ताटकळत ठेवतात. त्याअनुषंगाने राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी सार्वजनिक प्राधिकरणाणे अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याचे आदेश दिले आहेत

यासंदर्भात जागृत नागरिक महासंघाच्या नितीन यादव, उमेश सणस, राजेश्वर विश्वकर्मा व अशोक कोकणे या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांची दि एक नोव्हेंबर 2021 रोजी समक्ष भेट घेऊन त्यांना कोकण खंडपीठाच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

जागृत नागरिक महासंघाच्या निवेदनावर व्यापक समाजहित लक्षात घेत, अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत व प्रस्ताव मान्य करत आयुक्त राजेश पाटील यांनी तात्काळ परिपत्रक काढून मनपा मधील सर्व विभागांना नागरीकांसाठी अभिप्राय फॉर्म ठेवण्यासाठी आदेश दिलेले आहेत. सदर फॉर्म मधून संबंधित अधिकाऱ्याची नागरिकासोबतची वागणूक स्पष्ट होऊन त्याचा गोपनीय अहवालात मुल्यमापणासाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे मनपातील काही अधिकारी कर्मचारी यांचा उर्मटपणा उद्धटपणा आणि मुजोरीला चाप बसेल व नागरिकांना त्यांच्या कामासाठी आता ताटकळत ठेवण्याचे धाडस कोणी करणार नाही अशी महासंघाला खात्री वाटते.

जागृत नागरिक महासंघाच्या व्यापक समाजहिताच्या कार्याला आयुक्तांनी पाठींबा दाखवला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. असे जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन शशिकांत यादव यांनी सांगितले.