KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान

KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी - राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान
  • भाजपाकडून १७ जागेसाठी ६३ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीसाठी आपल्या सत्तेच्या काळात १५१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकलो, याचे आपणांस समाधान आहे. आगामी निवडणुकीत याच विकासकामाच्या जोरावर मतदार आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपाची सत्ता कायम राखण्यात सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पक्षाचे निवडणूक निरीक्षक बाळासाहेब महाडीक, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष वैभव शहा, अनिल गदादे, पप्पू धोदाड, गणेश पालवे, सुमित दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, मागील निवडणुकीत कर्जतकराच्या मतदानरुपी सहकार्यामुळे भाजपाची एक हाती सत्ता असताना कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण विविध विकासकामे पूर्ण करून शहराचा चेहरा- मोहरा बदलण्यात यशस्वी झालो. सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता कर्जतचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यात यश मिळाले. यासह ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज मंदीर परिसर-बाजारतळ या ठिकाणी पेव्हर ब्लॉक, अद्यावत स्मशानभूमी, विविध प्रभागात सिमेंटचे रस्ते, स्वच्छतेसाठी वाहतूक यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, शहरासाठी दोन भव्य गार्डन, महत्वाच्या ठिकाणी असलेले चौक सुशोभीकरण, जलयुक्त शिवार योजनेतील बंधारे अशी विकासकामे प्राधान्याने सोडविण्यात आले. मात्र मागील दोन वर्षांपासून विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी फक्त अश्वासनाची खैरात केली. सर्वसामान्य जनतेला खोटी स्वप्ने दाखवत अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. दोन वर्षात त्यांनी कर्जतकरासाठी आणि शहरासाठी कोणतेही भरीव कार्य केले नाही. याउलट सहा महिन्यांपासून ते रडीचा डाव खेळत आहे. राजकीय इर्षेला पेटून सुडाच्या, कुटील दबावाच्या राजकारणातून त्रासदायक चित्र उभारलेले जनता पाहत असल्याचा आरोप आ रोहित पवार यांचे नाव न घेता केले.

आगामी निवडणुकीत विजयाची खात्री नसल्याने तसेच समोर पराभव दिसू लागल्याने प्रशासकीय अधिकार्याना हाताशी धरून प्रभागनुसार मतदारयाद्यात छेडछाड करण्यात आली आहे. यासह दबावाच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी शहराच्या शेजारील खेडेगावामधील लोकांचा यामध्ये समावेश करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिकारी देखील निवडणूक आयोगाचे सर्व नियम, सुचना धाब्यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हरकतीवर सपशेल डोळेझाक करून लोकशाहीला काळीमा फासण्याचे कृत्य करीत आहे. याबाबत आपण न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले.

आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान

विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी मतदारसंघात राजकीय दबावतंत्र, दहशत, कुटील,कपटी आणि खुनशी राजकारण करीत भाजपातील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे. त्यांच्या मध्ये नैतिकता जीवंत असेल तर त्यांनी भाजपाच्या आयारामाना सोडून कर्जतची नगरपंचायत निवडणूक लढवून दाखवावी. तसेच स्वताच्या पक्षाच्या विकासाच्या मुद्द्यावर किती नगरसेवक निवडून आणतात ? हे जनतेला दाखवुन द्यावे, असे खुले आव्हान माजीमंत्री राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांना पत्रकार परिषदेत दिले.

जनतेच्या प्रश्नावर भाजपाने केलेली विकासकामे सत्ता मिळवून देणारा

आगामी निवडणुकीत भाजपाने केलेले जनताभिमुख विकासकामे आपल्या सत्ता मिळवून देणारा ठरेल. बुधवारी भाजपाकडून १७ प्रभागासाठी एकूण ६३ इच्छुक उमेदवारानी आपली मुलाखत दिली आहे. विकासकामाच्या जोरावर आपले सर्व उमेदवार जनतेच्या पसंतीस निश्चित उतरतील. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावरच भाजपा कर्जत नगरपंचायत निवडणूकीत यशस्वी ठरेल असा विश्वास राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मतदारसंघात सुरू असलेली दहशत, दबाव, खुनशी राजकारण जनता आता खपवून घेणार नाही.