येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण

येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण
  • रघुवीर खेडकर करणार नेतृत्व

मुंबई : करोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेली असतानाही राज्य सरकारने एका नवा पैशाची मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २१ सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय लोककलावंतानी घेतला आहे.

महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही. चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही. अशी खंत ह्या कलावंतांची आहे. म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनेनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु अद्यापही सरकार जागे झाले नाही.

म्हणूनच तमाशा पंढरी अशी ओळख असणाऱ्या नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगाव यांच्या पुतळ्यासमोर लोक कलावंतांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिथून तमाशा घडला, अन ज्या विठाबाईंनी आमच्या तमाशा कलावंताचे नाव जगभर पसरविले त्यांच्या गावातूनच आम्ही कलावंतांच्या मागण्यासाठी संघर्षचा शुभारंभ केला आहे. असे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

स्व. विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र कैलाश, कन्या मालती इनामदार, नातू विशाल, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास मंडळाचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, दत्ता महाडिक यांचे सुपुत्र संजय महाडीक, शांताबाई संक्रापुरकर, आदी लोककलावंत यांचा या आंदोलनात सहभाग आहे.