चेन्नई, ता. १८ : भारतीय हवामान खात्याने (IMD) नुकत्याच केलेल्या अंदाजानुसार तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे. चेन्नई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
हवामान संस्थेने आपल्या ताज्या हवामान बुलेटिनमध्ये तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल परिसरात गुरुवारपासून रविवारपर्यंत एक किंवा दोन ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वेल्लोर, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम आणि इरोड जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान संस्थेने म्हटले आहे.
चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील अनेक भागात गुरुवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पाणी साचले आहे. निवासी परिसर आणि रस्ते गुडघाभर पाण्याखाली आले आणि सार्वजनिक वाहतूक सेवांवर परिणाम करण्याबरोबरच वाहतूक कोंडी झाली.