
- ‘फेथ ग्रुप'कडून विनाशुल्क सादरीकरण
पिंपरी : ‘गुड फ्रायडे’ सणाच्या पार्श्वभूमीवर फेथ ग्रुप च्यावतीने बायबलवर आधारित वधस्तंभवार खिळलेला येशूचा जीवन प्रवास ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ या मराठी महानाट्यातून दाखविण्यात येणार आहे. राखेच्या बुधवार (ता.५)पासून (ॲश वेनेस्डे) ख्रिस्ती बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवास काळाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी हे नाटक आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
चिंचवडमधील सेंट ॲन्ड्र्युज हायस्कुलच्या मैदानावर रविवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे. या महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत करणार आहे. ‘वधस्तंभावर खिळलेला येशू आणि पुर्नरूत्थानाच्या दिवशी शिष्यांना दर्शन' असा येशू ख्रिस्ताचा जीवन प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव समाज बांधवांना घेता येणार आहे. ‘वधस्तंभावरील मरण यातना सहन करूनही प्रभू येशूने शांतता, मानवता व प्रेमाचा संदेश या नाटकाद्वारे देण्यात येणार आहे. या महानाट्यात ‘प्रभू येशू’ची मुख्य भूमिका जोशवा रावडे करणार आहे तर यहुदा इस्क्रोयतचे पात्र समीर चक्रनारायण करणार आहे. येशूचा शिष्य शिमोन पेत्राचे पात्र कॉलन सोरेस निभावणार आहे. यंदा नाटकाचे १५ वे वर्ष आहे. गेल्या १५ वर्षापासून फेथ ग्रुपच्यावतीने विविध जिल्ह्यात विनाशुल्क नाटकाचे सादरीकरण करण्यात येत आहे.
या महानाट्यात पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणतंबा, नाशिक या शहरातील ७० हौशी कलाकारांचा सहभाग घेतात. तत्कालीन वेशभूषा, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजना सादर करण्यात येते. या नाटकासाठी स्कूलच्या मैदानावर भव्य रंगमंच तयार केला आहे. तसेच बायबलमधील प्रसंग जिवंत करण्यासाठी स्टेजची सजावट बायबलमधील प्रसंगाला अनुसरून केली आहे. प्रियांका सोरेस, वेन्ड्रीच सोरेस यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
‘फेथ ग्रुप ही ख्रिस्ती बांधवांची एक सामाजिक संस्था आहे.‘फेथ फौंडेशन ग्रुप’च्या या उपक्रमाला २०१० मध्ये सुरूवात झाली. ‘येशू ख्रिस्ताचे दुखःसहन’ (द पॅशन ऑफ ख्राईस्ट ) हे पहिले नाटक सादर करण्यात आले. नवापुर, अहमदनगर, मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यात नाटकाचे प्रयोग करण्यात आले. वाढता प्रतिसाद पाहता दरवर्षी आमची संस्था उपवास समयात गुड फ्रायडे निमित्त ‘द व पॅशन ऑफ ख्राईस्ट’ हे मराठी नाटक विनाशुल्क सादर करते. संस्थेमधील चे आबालवृद्ध सदस्य नाटकात सहभाग घेतात.’
-नोएल व्हॅनहॉल्ट्रन, संस्थापक फेथ ग्रुप
