पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : काळेवाडी मुख्य रस्त्यावरील बस थांब्यांना शेड नाही. त्यामुळे उन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. वर्षानुवर्षे होत असलेली प्रवाशांची गैरसोय पहाता, तातडीने काळेवाडीत बंसथांबे शेडे उभारावेत. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
काळेवाडीत परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे येथून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रवाशांमध्ये महिला, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचीही प्रमाण जास्त आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी बसथांबा शेडची गरज आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्टीलचे शेड न उभारता भलत्याच ठिकाणी ते उभारले आहे. काळेवाडी दवाखान्यासमोर असेच शेड आहे. विशेष असे शेड शहरात अगदी गल्लीत पहायला मिळतात.
शेड नसलेले दोन्ही बाजूचे बसथांबे
- – बी. टी. मेमोरियल शाळेसमोर
- – ज्योतिबा मंगल कार्यालयसमोर
- – आठवण हॉटेलसमोर, विजयनगर
- – काळेवाडी मुख्य थांबा, पिंपरी कडे जाताना
- – बाजीप्रभू चौक, पेट्रोल पंपासमोर
बसथांब्यांना दुकानदारांचा विरोध :
बसथांब्यामुळे दुकान दिसत नाही. परिणामी आमच्या व्यवसायावर परिणाम होतो. असे कारण देत, बसथांबे बसविण्यास दुकानदारांचा विरोध आहे. त्यामुळे महापालिकेने येथे बसथांबे बसविले नसल्याचे सांगितले जात आहे. काळेवाडी मुख्य बसथांब्यावर फाट्याकडे जाताना शेड उभारले. मात्र, मागील दुकाने दिसण्यासाठी बसथांब्याचे वेळापत्रक लावलेला पत्रा काढून टाकण्यात आला आहे.
रातोरात गायब झाले बसथांबा शेड :
महापालिकेच्या वतीने स्टेनलेस स्टीलचे शेड काही वर्षांपुर्वी विविध बसथांब्यावर उभारण्यात आले. त्यावेळी प्रत्येक नगर सदस्यांना दोन शेड देण्यात आले. त्यानुसार ज्योतिबा मंगल कार्यालयासमोर पिंपरीकडे जाताना महापालिकेने शेड उभारले. मात्र, मागील व्यावसायिक गळ्यांना अडचण होईल म्हणून रातोरात हे शेड गायब करण्यात आले. त्यावेळी स्थानिक व्यापारी, काही नगरसदस्य, महापालिका अधिकारी यांच्या आर्थिक वाटाघाटीत झाल्या. अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे.
शहर स्मार्ट सिटीत रूपांतरित झाले. मात्र, बस थांब्यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध होत नसतील तर काय उपयोग, या स्मार्ट सिटीचा. प्रवाशांना उन, वारा, पावसात बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यात बसचे वेळापत्रक ढासळलेले असते.
– इरफान शेख, नागरिक
खासगी वाहनांपेक्षा शासकीय बसचा प्रवास कधीही चांगला. मात्र, शासन सार्वजनिक वाहतुकीकडे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. वाहनांची संख्या पाहता भविष्यात शासनाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे क्रमप्राप्त राहिल. यात शंका नाही.
– हरिश्चंद्र तोडकर, प्रवासी