पिंपरी : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चालविलेल्या प्रत्येक खरेदीत आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाढीव दराने काम देण्यासाठी काही माजी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणण्याचा निर्ल्लज प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरु आहे. जादा दराने ठराविक ठेकेदारांकडून खरेदी करण्यास एका अधिकाऱ्याने विरोध केला असता मंगळवारी काही माजी पदाधिकाऱ्यांनी मनपा आवारातच त्याला दमबाजी केली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याला व्हील चेअरच्या सहाय्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
कोरोनाचा वाढता संर्संग रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन असून मनपाचे केवळ १० % कर्मचारी कामावर आहेत. तसेच महानगरपालिकेची मार्च व एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या असून स्थायी समितीच्या बैठकासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी मनपा प्रशासनामार्फत युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. नेमके याच संधीचा फायदा उठविण्यासाठी काही माजी पदाधिकारी आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणून अव्वाच्या सव्वा दराने आपल्याच मर्जीतल्या ठेकेदारांडून वस्तू खरेदी करण्याचा अट्टाहास हि मंडळी बेशरमपणे करत आहेत.
मंगळवारी दुपारी कोरोना संदर्भात महत्वाची बैठक मनपामध्ये सुरु अस्तना काही माजी पदाधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अर्रवाच्च भाषेत शिवीगाळ केली. वाढीव दराने काही वस्तू खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्याला गंभीर स्वरुपात दमबाजी केली व कोरोना संपल्यावर बघून घेण्याची भाषा देखील केली.
वरिष्ठ नेत्याच्या समोर झालेल्या दमबाजीचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याची तब्येत अचानकपणे खालावली व त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी व्हील चेअरच्या सहाय्याने त्या अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
औषधे, वैद्यकीय उपकरणे, मास्क, सॅनिटायजर, धान्य, व गरजवंतांना जेवण अशा सर्वच कामात सुरु असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत. सतत होणारा शिवीगाळ, भ्रष्टाचार करण्यासाठी दबावाला देखील वैतागले आहेत. लोकांच्या सेवेचा दिखावा करून अशा बिकट परिस्थितीत स्वत:चा स्वार्थ साधाणाऱ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना लगाम लावायचा कसा, अश्या चिंतेत अधिकारी पडले आहेत.