दिघीत माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी | पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : बांधकाम सुरू असताना घरावर विटा व सिमेंट काँक्रिट जोरात पडून चिनी मातीची कौले फुटली. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मुलाने शेजारच्या व्यक्तींकडे वरती प्लॅस्टिकचा कागद टाकून द्या, पाऊस येतोय, तुमचे काम झालेवर कौले बदलून द्या. असे सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ करत दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही शुक्रवारी (ता. ३०) दिघीत घडली.

संतोष बबनराव वाळके असे माहिती अधिकार कार्यकर्ता व मुक्त पत्रकाराचे नाव असून त्यांचा मुलगा शुभम याने पोलिसांत फिर्याद दिली.

विष्वाकांत उर्फ गंगाधर कोंडीबा वाळके, ऋत्विक विश्र्वकांत वाळके, निलेश सुरेश वाळके, भरत चंद्रकांत वाळके, व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३३६, ४२७, १४३, १४७, १४९, १८८, २६९, ५०६(२), ५०४, ३४ तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१(बी), महाराष्ट्र कोविड-१९ विनिमयन २०२० कलम ११, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ३७(१, ३) व १३५ अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष वाळके घरी नसताना त्यांच्या घरात आजारी पेशंट आई, वयोवृध्द वडील, त्यांची दोन मुले व बहिणीची तीन मुले असा परिवार उपस्थित होता. त्यावेळी त्यांच्या घराचे मागील बाजूस घराचे बांधकाम सुरू होते. त्याचे प्लास्टर काम सुरू असताना घरावर विटा व सिमेंट काँक्रिट जोरात पडून चिनी मातीची कौले फुटली म्हणून त्यांच्या मुलाने लहान मुलीला शेजारच्या व्यक्तींकडे वरती बॅनर टाकून द्या, पाऊस येतोय, तुमचे काम झालेवर कौले बदलून द्या, एवढेच सांगितल्याचा राग धरून आरोपींनी शिवीगाळ करणे, दगडफेक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार केले. साधारण एक तास हा गोंधळ सुरू होता, तरी पोलीस मार्शल आले म्हणून पुढील प्रकार टळला.