कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. १७ जागेसाठी एकूण १०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या नामप्र आरक्षणाच्या स्थगितीमुळे आणि राज्य निवडणुक आयोगाच्या नुतन मार्गदर्शक सुचनेनुसार चार प्रभागात ११ उमेदवारी अर्ज वगळण्यात आले. यावेळी भाजपा २७ , राष्ट्रवादी २३, काँग्रेस ९, शिवसेना ३, रासप २, वंचित बहुजन आघाडी ३ आणि अपक्ष २२ असे १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड पाहायला मिळाली. अखेर प्रशासनास पोलीस दलाची मदत घ्यावी लागली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपले उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करीत दाखल केले. मंगळवारी एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज संख्या पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक २ जोगेश्वरवाडी आठ, प्रभाग क्रमांक ४ माळेगल्ली नऊ, प्रभाग क्रमांक ६ याशीननगर सात, प्रभाग क्रमांक ८ शाहूनगर आठ, प्रभाग क्रमांक ९ समर्थनगर सहा, प्रभाग क्रमांक १० बेलेकर कॉलनी पाच, प्रभाग क्रमांक ११ बर्गेवाडी सात, प्रभाग क्रमांक १२ शहाजीनगर सहा, प्रभाग क्रमांक १३ गोदड महाराज गल्ली चार, प्रभाग क्रमांक १४ सोनारगल्ली आठ, प्रभाग क्रमांक १५ भवानीनगर सहा, प्रभाग क्रमांक १६ अक्काबाईनगर तीन, प्रभाग क्रमांक १७ भांडेवाडी १२ असे एकूण १३ प्रभागासाठी ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या दि ८ रोजी सदर दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

नामप्र जागा वगळून निवडणूक प्रकिया राबविली जाणार – निवडणूक निर्णय अधिकारी थोरबोले

सुप्रीम न्यायालयाच्या कालच्या आदेशान्वये तसेच राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्जत नगरपंचायतीच्या नामप्र चार जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्या अनुसार कर्जत नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच आणि सात जागेवर उमेदवारी अर्ज घेण्यात आले नाहीत. सदर प्रभागासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. चार प्रभागात एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते ते अर्ज मंगळवारी वगळण्यात आले आहे.