फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक | फटाके विक्रीस बंदी घालण्याची विशाल जाधव यांची मागणी

फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक | फटाके विक्रीस बंदी घालण्याची विशाल जाधव यांची मागणी

पिंपरी : फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक आहे. त्यामुळे कोव्हीड – १९ (कोरोना) या विषाणूच्या महामारीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत फटाके स्टाॅल व फटाके विक्रीस बंदी घालण्यात यावी. अशी मागणी बाराबलुतेदार महासंघाचे युवाप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशसचिव विशाल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत विशाल जाधव यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण जगावर कोव्हीड १९ (कोरोना) ह्या महामारीचे संकट उभे आहे. या रोगाच्या पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो. हा रोग फुफ्फुसांशी संबंधित असून जे कोरोनामधून बरे होतात, त्यांना पूर्णपणे सामान्य होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता सर्वत्र कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

म्हणूनच यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिपावलीत फटाके फोडता येऊ नये. आणि संपूर्ण परिसर प्रदुषण मुक्त रहावा, यासाठी फटाक्यांपासून दूर रहाणे ही काळाची गरज आहे. शहर प्रदुषण मुक्त रहाण्यासाठी आपणच ही पाऊले उचलणे जरुरीचे आहे. या साथीच्या रोगात, हा विषारी वायू कोठेही होम क्वारंटाईनमध्ये राहणा-या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतो. विषारी धुरामुळे कोणत्याही जीवाला धोका होऊ शकतो.

वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक आहे. दिपावलीमध्ये, आपले शहर फटाक्यांच्या विषारी वायूने भरण्यापासून वाचवणे काळाची गरज आहे. शहरात यंदाच्या वर्षी व्यापाऱ्यांस फटाके विक्रीस बंदी घालून संघर्ष करीत असलेल्या किंवा कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा.