- उन्नती सोशल फाउंडेशनच्या “बेस्ट दांडिया ग्रुप डान्स स्पर्धेची” पिंपळे सौदागरमध्ये धूम
- युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग, स्पर्धकांवर बक्षिसांची बरसात
पिंपळे सौदागर, (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट आले तेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशनची (Unnati Social Foundation) टीम नागरिकांची काळजी घेण्यात व्यस्त होती. जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जीवाची परवा न करता उन्नतीच्या टीमने नागरिकांच्या दारात जाऊन अन्नपुरवठ्यापासून ते रुग्णालयात बेड उपलब्ध करेपर्यंत कष्ट घेतले. माझ्या प्रभागातील एकाही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ नये, या आकांक्षेने उन्नती सोशल फाऊंडशन लढत राहिले. ते आपल्या कार्यात यशस्वी झाले असून त्यांच्यामुळेच आपल्याला आज दांडियाचा मनसोक्त आनंद घ्यायला मिळाला. त्यामुळे उन्नती हे केवळ फाऊंडेशन नसून ती सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ आहे, असा विश्वास अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त पिंपळे सौदागर आणि रहाटणी येथील नागरिकांसाठी “बेस्ट दांडिया ग्रुप डान्स स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा राजमाता जिजाऊ उद्यानात (दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) संपन्न झाली. या स्पर्धेस सोसायटीतील रहिवासी वर्गाचा भरघोस प्रतिसाद मिळाला. उद्योजक मा. शंकरशेठ जगताप व उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सामुदायिक दांडियाच्या कलाविष्कारामुळे सहभागी मंडळींचा उत्साह वाढला होता. अबालवृद्धांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. ज्येष्ठांनी वय विसरून लहानांसमवेत दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. यानिमित्ताने नृत्याविष्कारासह गाणी व गप्पागोष्टीही रंगल्या.
या स्पर्धेतील मुख्य आकर्षण मेगा लकी ड्रॉचे होते. कार्यक्रमात स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १५,५५५, दुसरे बक्षीस रोख रकम १३,३३३, तिसरे बक्षीस रोख रक्कम ११,१११, चौथे बक्षीस रोख रक्कम ९,९९९, पाचवे बक्षीस रोख रक्कम ७,७७७, सहावे बक्षीस ५,५५५, तर लकी ड्रॉ मधील विजेत्यांसाठी ५००० रोख बक्षीस देण्यात आले. बेस्ट सोलो डान्स आणि उत्कृष्ट वेशभूषा साकारणाऱ्यास दररोज ५० बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण “लय भारी कारभारी” मालिका फेम अभिनेत्री अनुष्का सरकटे, तिरसट मराठी चित्रपटाची अभिनेत्री तेजस्विनी शिर्के आणि डान्सर (मॉडेल) जज अनुष्का गाडेकर या होत्या. दांडिया स्पर्धेत विविध सोसायटीतील एकूण 48 संघांनी सहभाग घेतला होता.
कुंदाताई भिसे (Kundatai Bhise) म्हणाल्या, कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दांडिया नृत्याच्या ‘डिस्को दांडिया’ कार्यक्रमात युवक-युवतींचा उत्साह संचारला. नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभुषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरणाने कौशल्य प्रकट केले. यामध्ये परिसरातील दांडिया ग्रुपने सहभाग घेतला. सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेला हा दांडिया कार्यक्रम प्रत्येक समाजबांधवांना एकत्र जोडणारा ठरला, असे सौ. कुंदाताई म्हणाल्या.
अल्को सोसायटीच्या दिपाली राडे म्हणाल्या, ज्या ज्या वेळी संकट आले त्या त्या वेळे उन्नतीच्या माध्यामातून कुंदाताई आमच्या मदतीला आल्या. विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेऊन आम्हा सर्वांना त्यामधे सहभागी होण्याची संधी दिली. उन्नती ही आमची हक्काची झाली आहे. कोणत्याही प्रासंगिक मदतीला धावून येत असल्यामुळे आम्हाला खूप मोठा आधार वाटतोय. आज दांडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याबद्दल उन्नती व कुंदाताईंचे मनापासून आभार.
कार्यक्रमाला भानुदास काटे पाटील, महापौर उषा माई ढोरे, प्रकाश झिंजुर्डे, विशाल काटे, राजेंद्र जस्वाल, बापू काटे, जगन्नाथ काटे, जयनाथ काटे, उत्तम धनवटे, रमेश वाणी, निर्मला कुटे, अतुल पाटील, सुनिल टोनपे, आदी उपस्थित होते. निलेश नखाते यांनी सौ. कुंदाताईंना खंबीर पाठिंबा दिला. अल्कोव्ह सोसायटीतील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यासाठी आयोजकांचे कुंदाताईंनी आभार मानले.