होय, आहे आपली दहशत – आमदार रोहित पवार

होय, आहे आपली दहशत - आमदार रोहित पवार

प्रतिनिधी|कर्जत : होय, आहे आपली दहशत पण ती विकासाच्या राजकारणाची, महिला, माता- भगिनींच्या संरक्षणाची. विकासाच्या राजकारणावर बोलायचे असेल तर आपली केव्हाही तयारी आहे. आरोप – प्रत्यारोप करताना भविष्यात तुम्ही आणखी पातळी खाली घालवली तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे नैतिकता राखून बोला अन्यथा पुढील दहा वर्षात जनता काय करू शकते ते पहा. आपण विधानसभेत जे शब्द दिले तो पाळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी थोडा अवधी लागणार आहे. मात्र तरी आपण काही ठिकाणी तो शब्द पाळला नाहीतर माझे कान पकडण्याचा अधिकार देखील जनतेला आहे असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.


दि.७ रोजी ते कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज दाखल सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, नानासाहेब निकत, बारामती ऍग्रोचे सुभाष गुळवे, हभप अमृत खराडे गुरुजी, अशोक जायभाय आदी उपस्थित होते. मंगळवारी आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, कर्जतचे राजकीय वातावरण कर्जतची सर्वसामान्य जनता तापवणार आहे. बाजार बघून विरोधकांनी सभा घेतली हेच त्यांचे पराभवाचे लक्षण दिसत आहे. ज्यांनी गटातटाचे राजकारण केले त्यांना मतदारसंघातील विकास काय दिसणार असे म्हणत राम शिंदेंना टोला लगावला. दोन वर्षात संकटे असताना कर्जत-जामखेडसाठी निधी उपलब्ध केला. कर्जतसाठी आगार आणतो वाट बघा अजून किती दिवस वाट बघायची ? असे म्हणत राम शिंदेंना प्रत्युत्तर दिले. निवडणूक आली की एसटी बसेस आणायचे आणि परत पाठवून द्यायचे एवढे काम त्यांना छान जमले. सगळे अधिकारी-कर्मचारी यांना एका छताखाली आणत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. ज्या प्रभागात अथवा वाडी-वस्तीवर पाणी योजना नाही त्यांच्यासाठी आपण वाढीव पाणी योजना अंमलात आणली आहे. राजकीय समीकरण जुळवत असताना अनेक निष्ठावान कार्यकर्त्याना न्याय मिळाला नाही त्यांनी नाराज व्हायचे नाही. आपल्या पक्षाच्या विजयासाठी त्यांनी पुरेपुरे प्रयत्न करायचा आहे. भविष्यात त्यांना निश्चित संधी दिली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले सर्व उमेदवार जनतेच्या कामासाठी कटीबद्ध त्यांना साथ द्या असे आवाहन उपस्थित जनसमुदायास आ पवार यांनी केले.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, नामदेव राऊतांची नाळ सर्वसामान्य जनतेशी आहे ती फक्त विकासकामामुळेच. १३ तारखेला किती उमेदवार भाजपाकडे राहतील ? हे नामदेव राऊत तुम्हाला दाखवून देईल. आपल्या पक्षांतरावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले मात्र आपण आ. रोहित पवार यांच्या विकासाचे दृष्टिकोन पाहून त्यांना साथ देण्यासाठीच राष्ट्रवादीत आलो. कर्जतचे टपरीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय आ. पवार यांनी घेतला त्यामुळे कोणीही त्यात वंचित राहणार नाही. पाणी योजना तात्काळ पूर्ण करण्यासाठी नामदेव राऊत आणि त्यांच्या सहकार्याचा मोलाचा वाटा आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये १७-० करण्याचा निर्धार आपल्या भाषणात राऊत यांनी व्यक्त केला. माजीमंत्री राम शिंदेच्या विरोधात विधानसभेला काम करणाऱ्या अंबादास पिसाळ यांना आपल्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण ज्या पक्षात जातो तेथे प्रामाणिकपणे कामच करतो असे म्हणत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा विशाल मेहत्रे म्हणाले की, आजची गर्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित आहे. काल भाजपाने आठवडे बाजाराचा फायदा घेत गर्दी जमवत आपले उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रची अस्मिता असणारा भगव्या ध्वजाचा अपमान माजीमंत्र्यानी केला. आ. पवार जमिनीवर पाय ठेवणारा लोकप्रतिनिधी आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा लोकप्रतिनिधी मतदारसंघाला लाभला हे आपले भाग्य आहे.


यावेळी राष्ट्रवादीचे सूर्यकांत मोरे, शहराध्यक्ष सुनील शेलार, शब्बीरभाई पठाण, मनीषा सोनमाळी, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, संतोष मेहत्रे आदींची भाषणे झाली.

दहशत असली असती तर महिला मोठ्या संख्येने माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते का ? खा विखे आणि राम शिंदेच्या आरोपाना उत्तर
मागील अनेक वर्षांपासून महिला-भगिनी घराबाहेर पडत नव्हते. कारण या माणसाची इतकी भीतीयुक्त दहशत होती. आज तीच महिला-भगिनी स्वयंस्फूर्तीने सहज बाहेर पडत आहे. कारण तिला आता मोकळे वातावरण निर्माण केले आहे. मग खरी दहशत कोणाच्या काळात आणि कोणाची होती ? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. अधिकारी मनमोकळे काम करीत आहे. त्यांना पुरस्कार मिळत आहे. मग कुठे आहे आता दहशत असे म्हणत आ. रोहित पवार यांनी खा. विखे आणि माजीमंत्री राम शिंदेवर टीकास्त्र सोडले.