Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

पिंपरी (लोकमराठी) : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक नागरिक आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. मात्र आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या काळात वैद्यकीय अथवा मृत्यू किंवा अन्य अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतू राज्यातील अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे ज्यांना खरच गरज आहे अशा व्यक्तींना आता इच्छित ठिकाणी जाता येणार आहे. मात्र, हा ई-पास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे.

https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन आवश्यक असलेली कागदपत्र आणि फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे शहरातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे. तर 44 जण करोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, यामुळे देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आले असून शहरात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना इतर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु, अत्यावश्यक सेवांसह इथे राहात असलेल्या व्यक्तींच्या काही अडचणी आहेत. पहिल्या सत्रातील लॉकडाउनमध्ये अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा शहरात प्रसूती करण्यास कोणी नसल्याने इतर जिल्ह्यातील गावाला जाण्यासाठी अनेक जणांनी पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, त्यावर पोलीस अधिकारी काही करू शकत नव्हते. परंतु, आता अशा व्यक्तींना ई-पास मिळणार आहेत.

Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

कसा मिळवायचा ई-पास –

१) आंतरजिल्हा प्रवासासाठी https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस येथे स्वतः नोंदणी करून आवश्यक ते कागदपत्र व फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करावा.

२) अर्ज भरताना अत्यावश्यक सेवा कारण/ उद्देश येथे आपला आंतरजिल्हा प्रवास करण्याचा उद्देश स्पष्ट लिहावा.

३) आंतरजिल्हा प्रवास प्रारंभ ठिकाण व प्रवासाचे अंतिम ठिकाण स्पष्ट लिहिणे अत्यावश्यक आहे.

४) योग्य कागदपत्रे जोडणे अत्यावश्यक आहे.

५) ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधितांना टोकन अदा करण्यात येईल. (सदरचा टोकन क्रमांक जपून ठेवावा. जेणेकरून आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यास मदत होईल.)

६) पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच ई-पास अदा करण्यात अथवा नाकारण्यात येईल.

७) आपल्याला मिळालेल्या टोकनद्वारे अर्जाची सद्यस्थिती तपासताना अर्ज मंजूर झाला असल्यास वेबसाईटवरूनच आपला ई-पास डाऊनलोड करावा.

८) ई-पास मिळाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधितांनी जवळ ठेवावी. पोलीस नाकाबंदी ठिकाणी मागितल्यानंतर तेथे दाखवावी.

९) सदरचे ई – पास हे फक्त आंतरजिल्हा प्रवासासाठीच ऑनलाईन मिळतील.