युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून ‘उद्योजकतेची’ कास धरावी – दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन

युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून 'उद्योजकतेची' कास धरावी - दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन
  • आयआयएमएसच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न

पिंपरी : युवकांनी महाविद्यालयीन काळापासूनच करिअरसाठी केवळ नोकरी हा पर्याय डोळ्यासमोर न ठेवता ‘उद्योजक’ हा देखील भक्कम पर्याय असून शकतो यादृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ दत्तात्रय आंबुलकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन – एआयसीटीई चा इनोव्हेशन विभाग व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उद्योजकता- करिअरचा पर्याय’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.


यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात उद्योजकतेची तयारी कशी करावी, उद्योजक म्हणून तयार होण्यासाठी कोणत्या अटी आहेत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? उद्योजकतेमध्ये भविष्यातील आणि अपयशाच्या शक्यता काय आहेत? याबद्दल सविस्तर माहिती विविध उदाहरणांद्वारे सांगितली. तसेच उद्योजक म्हणून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपली विचारसरणीही देखील उद्योजकीय मानसिकतेची असायला हवी, असे सांगत संपत्ती निमिर्तीच्या जागा जो निर्माण करू शकतो, शोधू शकतो तोच व्यक्ती उद्योजक होऊ शकतो असे मत आंबुलकर यांनी व्यक्त केले.

वेबिनार च्या द्वितीय सत्रात डॉ. संजय लाकोडे यांनी त्यांच्या व्याख्यानात पेटंट नोंदणीच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देताना त्यांनी बौद्धिक संपदा व पेटंट म्हणजे काय, ट्रेडमार्क, कॉपीराइट, डिझाईन्स, भौगोलिक संकेत आणि व्यापार रहस्ये यासारख्या बौद्धिक मालमत्तेच्या विविध क्षेत्रांबाबत तपशीलवार माहिती दिली, याशिवाय पेटंटबद्दल बोलत असताना त्यांनी पेटंटचा अर्थ स्पष्ट करत पेटंटची गरज का आहे, त्याचा फायदा कसा होतो, पेटंटमध्ये काय समाविष्ट आहे, पेटंट प्रक्रिया कशी असते , पेटंट खटल्याचा फ्लोचार्ट, फॉर्म कसे आहेत, पेटंट भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती यासाठी किती खर्च येतो याबद्दल सविस्तर माहिती काकोडे यांनी दिली.
दोन्ही व्याख्यात्यांनी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यानी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले तर वेबिनारचे समन्वयक म्हणून प्रा.स्वाती भालेराव यांनी काम पाहिले. जवळपास सुमारे १५० हुन अधिक विद्यार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.