- नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ‘प्लॉगेथॉन-२०२१’ मोहिम यशस्वी
पिंपळे सौदागर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या ‘प्लॉगेथॉन’ अभियानाला पिंपळे सौदागर प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आपला प्रभाग, कचरामुक्त प्रभाग’ असा संकल्पच या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी हाती घेतला आहे.
आज सकाळी सात ते दहा या वेळेत हे अभियान संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात राबविले गेले. या अभियानांतर्गत पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते रॉयल सोसायटी रस्ता आणि दत्त मंदिर ते स्वराज चौक मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त विकास ढाकणे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक नाना काटे, भूषण पाटील, नगरसेविका निर्मला कुटे, राजेंद्रनाथ जयस्वाल, लायन्स क्लबचे अंजुम सय्यद, आनंद हास्य क्लबचे सदस्य, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व सफाई कर्मचारी तसेच पिंपळे सौदागरमधील युवक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत परिसराची साफसफाई केली.
यावेळी बोलताना कुंदा संजय भिसे म्हणाल्या की, ‘प्लॉगेथॉन’ अभियान हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अतिशय स्तुत्य उपक्रम असून अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने शहरात राबविण्याची गरज आहे. विशेषतः या अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याने नागरिकांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव या मोहिमेतून होणार आहे. या प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन आणि पिंपळे सौदागरमधील सर्व नागरिक नेहमीच अग्रेसर होऊन सहभाग घेऊ व आपला प्रभाग आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.