हडपसर, दि. १७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे अल्युमनी असोसिएशन, प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे श्री. प्रवीण खिलारे, श्री.सागर ढेकळे व अवधूत राऊत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनीसुद्धा भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न तरुणांच्या जीवावर पाहिले होते. आजच्या तरूणांनी स्कील बेस एज्युकेशन घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करावा. असे मत प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी व्यक्त केले.
श्री.अवधूत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच या NGO चा पूर्व इतिहास सांगितला. या NGO ची स्थापना मॅथ्यू स्पेसीने 1999 मध्ये केली असून, मॅजिक बसने 12 ते 18 वयोगटातील मुलांना आणि तरुणांना मोठे होण्यासाठी आणि गरिबीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून दिली आहेत. मॅजिक बसने आत्तापर्यंत 10 लाख मुलांचे आणि तरुणांचे जीवन बदलले आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या 20 वर्षांत मॅजिक बसने ग्रामीण आणि निम-शहरी भागात राहणाऱ्या वंचित गटांसाठी शाश्वत उपजीविका कार्यक्रम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्था, सरकारी युनिट्स, कॉर्पोरेशन आणि समुदाय-आधारित संस्थांसोबत काम केले आहे. मॅजिक बसने मुंबईतील गरिबीत जगणाऱ्या 10 लाख मुलांचे आणि तरुणांचे जीवन बदलून टाकले आहे. त्यांना लहानपणापासून आव्हानांनी भरलेल्या जीवनात अर्थपूर्ण उपजीविकेकडे नेले आहे. मॅजिक बस हा भारतातील सर्वात मोठ्या गरिबी निर्मूलन कार्यक्रमांपैकी एक आहे. मॅजिक बस नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये 8912 मुलांसह काम करते. तसेच अमेरिका, यूके, सिंगापूर, बांगलादेश, जर्मनी आणि म्यानमार येथे नेटवर्किंग आणि निधी उभारणी कार्यालये आहेत. पुण्यात खडकी, डेक्कन, लोणावळा, कॅम्प आणि पर्वती अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यांच्यामार्फत तरुणांना कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण देऊन, वेगवेगळ्या कार्पोरेट सेक्टरमध्ये प्लेसमेंट केली जाते. अशा स्वरूपाचे मार्गदर्शन अवधूत राऊत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल चौरे यांनी तर आभार प्लेसमेंट सेलच्या चेअरमन डॉ. हेमलता कारकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील ढोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.संगीता यादव, प्रा. तृप्ती हंबीर, डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. संदीप वाकडे, डॉ. सुनील खुंटे, डॉ.मल्हारी रास्ते, प्रा. प्रदीप जाधव आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.